मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

By Admin | Updated: November 30, 2015 02:39 IST2015-11-30T02:39:43+5:302015-11-30T02:39:43+5:30

मालवाहतूक चालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण होतो.

Traffic Tasks for Shipping Carriers | मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

मालवाहतूक चालकांना वाहतुकीचे धडे

अपघात कमी करण्यासाठी आरटीओचा स्तुत्य उपक्रम : एक लाख वाहन चालकांचे केले प्रबोधन
नागपूर : मालवाहतूक चालक वर्षानुवर्षे देशभरात मालवाहतूक करीत असतात. एकच एक काम करीत असल्यामुळे अनेकांमध्ये फाजिल आत्मविश्वास निर्माण होतो. यातच प्रवास मोठा असल्याने वेगावर नियंत्रण राहत नाही. यामुळे अपघाताचा धोका निर्माण होतो. याला लक्षात घेऊन प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) शहरने, ‘जनआक्रोश’ या सामाजिक संघटनेच्या सहकार्याने मालवाहतूक चालकांसाठी प्रबोधन वर्ग सुरू केले आहेत. आतापर्यंत सुमारे एक लाख चालकांचे प्रबोधन करण्यात त्यांना यश आले आहे.
गेल्या काही वर्षांत रस्त्यांचे रुंदीकरण झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग चौपदरी, सहापदरी झाले आहेत. ग्रामीण भागातील रस्तेही चांगले झाले. पण अपघातांची संख्या मात्र कमी झाली नाही. अपघातांचे वाढते प्रमाण ही राष्ट्रीय समस्या झाली आहे. विशेषत: महार्गावर अपघातांची वाढती संख्या आणि त्यामुळे दगावणाऱ्यांच्या वाढत्या प्रमाणाला रोखण्यासाठी आरटीओ, शहरने २०१२ पासून एक अभियान हाती घेतले. यात मालवाहतूक चालकाला परवाना (ट्रान्सपोर्ट लायसन्स) देण्यापूर्वी किंवा त्याचे नुतनीकरण करण्यापूर्वी त्याचे दोन तास प्रबोधन केले जाते. मोटार वाहन निरीक्षक आणि जनआक्रोशचे सदस्य चित्रफितीच्या मदतीन हे प्रबोधनाचे वर्ग घेतात. यात चालकाच्या होत असलेल्या चुका त्यामुळे घडत असलेला अपघात यावर मार्गदर्शन करतात.
अपघात झाल्यास काय करावे, याची प्रात्यक्षिकासह माहिती देतात. चौपदरी रस्त्यावर जड वाहन असल्यास वाहनचालकाने डाव्या बाजूच्या लाईनमधूनच वाहन चालविणे, या सारख्या नवीन नियमांवर चर्चा आणि त्यातून मार्गदर्शन करतात. आठवड्यातून मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी हे वर्ग घेतले जातात. या वर्गात उपस्थित असलेल्या चालकांनाच परवान्याची पुढील प्रक्रिया पूर्ण होते. राज्यात बोटावर मोजण्या इतक्या आरटीओ कार्यालयात ही मोहीम सुरू आहे. त्यात शहर आरटीओ कार्यालय आघाडीवर आहे.
आतापर्यंत एक लाख मालवाहतूक चालकांचे प्रबोधन करण्यात आले आहे. तत्कालीन प्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) सर्जेराव शेळके यांच्या मार्गदर्शनात सुरू झालेला हा उपक्रम सध्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी दुर्गप्पा पवार यांच्या मार्गदर्शनातही यशस्वीरीत्या सुरू आहे. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर) विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (पूर्व) रवींद्र भुयार आणि जनआक्रोशचे सचिव रवींद्र कासखेडीकर यांच्या नेतृत्वात हे वर्ग सुरू आहेत. (प्रतिनिधी)
चालकांसाठी प्रबोधन वर्ग महत्त्वाचा
अनेक मालवाहतूक चालक जुन्याच नियमांना घेऊन वाहतूक करीत असतात. यामुळे अपघात संभावतो. पूर्वी आणि आत्ताच्या रस्त्यांमध्ये बराच बदल झालेला आहे. त्या अनुषंगाने नवनवीन नियमही तयार होत आहेत. याची माहिती होण्यासाठी आणि एकच एक काम करीत असल्याने त्यांच्यामध्ये आलेला उतावीळपणा त्यांच्याच नजरेत आणून देण्यासाठी या पद्धतीचे प्रबोधन वर्ग महत्त्वाचे ठरत आहे.
-विजय चव्हाण, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी (शहर)

Web Title: Traffic Tasks for Shipping Carriers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.