मेट्रोच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी
By Admin | Updated: March 16, 2017 02:18 IST2017-03-16T02:18:12+5:302017-03-16T02:18:12+5:30
शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मेट्रोच्या बांधकामामुळे वाहतूक कोंडी
मेयो हॉस्पिटल चौक : नागरिक त्रस्त, रस्त्यावर अंधार
नागपूर : शहरात सुरू असलेल्या विकास कामांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच मेयो चौकातील मेट्रोच्या बांधकामामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सकाळी या मार्गावरून कार्यालयात जाणाऱ्यांनी वाहतुकीच्या कोंडीमुळे मार्ग बदलला आहे. त्यातच सायंकाळी परत येणाऱ्यांना अंधारातच मार्ग काढावा लागत आहे. वाहतुकीची कोंडी
सोडविण्यासाठी वाहतूक पोलीस जास्त संख्येने तैनात करण्याची मागणी या परिसरातील दुकानदार आणि नागरिकांनी लोकमतशी बोलताना केली.
रामझुला-२ आणि मेट्रोचे बांधकाम वेगात सुरू आहे. पण वाहतूक कोंडी सोडविण्याकडे दुर्लक्ष करण्यात येत असल्यामुळे अनेक जण दुसऱ्या मार्गाने कार्यालयात पोहोचत आहेत. रामझुला-२ च्या बांधकामामुळे रामझुला-१ वरून सर्वच गाड्यांची ये-जा सुरू आहे. या पुलावरून चढताना प्रारंभीच अनेक वाहने वळसा घालून परत जातात. त्यामुळे रेल्वे स्थानकाकडून येणाऱ्या वाहनांची कोंडी होते. यामुळे रेल्वे स्थानकाकडे जाणारी वाहने याच ठिकाणी थांबतात. या परिसरातील नागरिकांनी वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलीस उपायुक्तांकडे निवेदने दिली आहेत. पण पोलीस वाहतूक कोंडीकडे लक्ष न देताना चालान फाडण्यात गर्क दिसतात. ही नेहमीची बाब आहे. मेट्रो रेल्वेचे सुरक्षा रक्षक वाहनांना दिशा देण्याचा प्रयत्न करतात. पण त्यांना न जुमानता चालक वाहने पुढे नेतात. ही बाब वाहतूक कोंडीसाठी कारणीभूत आहे.
तसेच मेयो चौकातून संत्रा मार्केट मार्गाने रेल्वे स्थानकाला जाताना वाहनचालकाला विशेष प्रयत्न करावे लागतात. या ठिकाणी मेट्रो रेल्वेचे बांधकाम सुरू असल्यामुळे सर्व ठिकाणी बॅरिकेडस् लावले आहेत. वाहनचालकाला त्यातून मार्ग काढणे जोखिमेचे ठरत आहे. दूरपर्यंत असलेल्या बॅरिकेडस्ला वळसा घालून प्रवाशांना स्थानकापर्यंत पोहोचावे लागते. ही स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे.
याशिवाय संत्रा मार्केटकडून गांधीसागरकडे जाणाऱ्या मार्गावर एम्प्रेस मॉलसमोर सिमेंट रस्त्याचे बांधकाम सुरू आहे. त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. काम संथगतीने सुरू असल्यामुळे वाहतूक सुरू होण्यासाठी बरेच दिवस वाट पाहावी लागणार आहे.
याशिवाय सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर रामझुला-१ वरून मुख्य रेल्वेस्थानक चौकात उतरल्यानंतर रस्त्याच्या कडेला उभी असलेली चारचाकी वाहने आणि आॅटोमुळे वाहतुकीची दरदिवशी कोंडी होते.
या चौकात वाहतूक सुरळीत करण्याऐवजी वाहतूक पोलीस चालान फाडण्यात गर्क असल्याचे दिसून येतात. येथील वाहने हटवून वाहतुकीसाठी रस्ता मोकळा करून देण्याची या परिसरातील लोकांची मागणी आहे.(प्रतिनिधी)