वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद
By Admin | Updated: September 19, 2014 00:53 IST2014-09-19T00:53:31+5:302014-09-19T00:53:31+5:30
एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही

वर्दळीच्या मार्गावरील वाहतूक सिग्नल बंद
नागपूर : एकिकडे नागपूरकरांना मेट्रो रेल्वेची स्वप्ने दाखविली जात असताना सध्या अस्तिवात असलेल्या शहरातील वाहतूक सिग्नल यंत्रणेचे मात्र पुरते वाटोळे झाले आहे. शहरातील वर्दळीच्या मार्गावरील काही वाहतूक सिग्नल बंद असल्याने तसेच काही सिग्नलचे टायमर बंद असल्याने त्याचा वाहनचालकांना फटका बसतो आहे.
सिव्हील लाईन्समध्ये अनेक सरकारी कार्यालये आहेत. कार्यालय सुरू होण्याच्या आणि सुटण्याच्या वेळी या भागातील रस्त्यावर वर्दळ असते. नेमके त्याच वेळी जीपीओ चौकातील सिग्नल बंद असतो. या मार्गावरील वाहनांची गर्दी लक्षात घेतली तर अपघाताचा धोका नाकारता येत नाही. विशेष म्हणजे पोलीस आणि महसूल खात्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची वाहने या मार्गावरून जात असतात. तरीही त्याची दखल घेतली जात नाही याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
अमरावती मार्गावरील बोले पेट्रोलपंपाजवळील सिग्नल कधी सुरू तर कधी बंद असतो. त्यापुढे गेल्यावर धरमपेठ शाळेजवलील सिग्नलचीही हीच स्थिती आहे. दक्षिणपश्चिम नागपूरमधील रिंगरोडवरील पडोळेनगर चौकातील सिग्नलचे काही दिवे बंद आहेत. त्यामुळे गोपालनगरकडून येणाऱ्या नागरिकांना सिग्नल सुरू केव्हा होतो आणि बंद केव्हा होतो हे कळतच नाही. स्वत:च अंदाज बांधून वाहने काढावी लागते.हा रस्ता दिवसरात्र वाहता असतो आणि सूसाट वेगाने वाहने धावत असतात. वर्धा मार्गावरील रहाटे कॉलनी चौकातून पुढे साईबाबा मंदिराकडे जाताना लागणाऱ्या सिग्नलची अवस्था यापेक्षा वेगळी नाही. कारागृहाजवळील सिग्नल सुरू कमी आणि बंद अधिक काळ असतो. अजनी चौकातील सिग्नलच्या दिव्यांवर झाडांच्या फांद्या आल्या आहेत. देवनगर चौक, साईबाबा मंदिर चौकातील सिग्नलचे टायमर बंद आहे. कमी अधिक प्रमाणात शहरातील इतरही भागात यापेक्षा वेगळी स्थिती नाही.
बजाजनगरपासून शंकरनगरपर्यंत सिमेंट रस्त्याचे काम अनेक महिन्यांपासून सुरू आहे. त्यामुळे सध्या या रस्त्यावरून एकेरी वाहतूक सुरु आहे. सकाळी आणि सायंकाळी या रस्त्यावर होणाऱ्या कोंडीचा शाळेचे विद्यार्थी, सरकारी कर्मचाऱ्यांसह सर्वसामान्य नागरिकांना फटका बसतो. मात्र त्याची दखल कुठल्याच पातळीवर घेतली जात नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जातो आहे. (प्रतिनिधी)