मैत्रीच्या इच्छेतून निर्माण झाली परंपरा
By Admin | Updated: September 3, 2014 01:15 IST2014-09-03T01:15:22+5:302014-09-03T01:15:22+5:30
महाविद्यालयीन जीवनात एकमेकांशी ओळख झाली आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आपली मैत्री कायम राहावी म्हणून काही मित्रांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. आज याच गणेशोत्सवाला पाहता पाहता

मैत्रीच्या इच्छेतून निर्माण झाली परंपरा
अष्टविनायक दर्शन : श्री अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक मुन्ना जयस्वाल यांच्याशी संवाद
नागपूर : महाविद्यालयीन जीवनात एकमेकांशी ओळख झाली आणि मैत्रीचे संबंध निर्माण झाले. आपली मैत्री कायम राहावी म्हणून काही मित्रांनी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. आज याच गणेशोत्सवाला पाहता पाहता २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. धंतोलीच्या प्रसिद्ध अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेचा सध्या रौप्यमहोत्सव सुरू आहे. यानिमित्ताने संस्थेने भाविकांसाठी अष्टविनायक दर्शनाची सोय केली आहे. मुन्ना जयस्वाल, सागर मेघे, राजेंद्र मुळक आणि किरण पांडव या संस्थेचे संस्थापक आहेत.
मुन्ना जयस्वाल म्हणाले, शिक्षण पूर्ण झाल्यावर मित्रांचे मार्ग वेगवेगळे होतात. पण आम्ही मित्रांनी मैत्री जपण्यासाठी गणेशोत्सवाला प्रारंभ केला. १९९० साली अष्टविनायक बहुउद्देशीय संस्थेची स्थापना करण्यात आली. त्यानंतर धंतोली येथे रस्त्यावर गणेश स्थापना केली. पण यामुळे वाहतुकीला त्रास होताना पाहून दुसऱ्या वर्षी महादेवराव तिवारी यांनी गणेशोत्सवाला त्यांची जागा दिली. तेव्हापासून या जागेवरच सागर मेघे यांच्या हस्ते बाप्पाची विधिवत स्थापना करण्यात येते.
जयस्वाल म्हणाले, गेल्या २५ वर्षांपासून बाबूलाल सूर्यवंशी यांनी तयार केलेली श्रींची प्रतिमा स्थापन करण्यात येते. त्याचे स्वरूप आणि उंची दरवर्षी समान ठेवण्याचा आमचा प्रयत्न असतो. केवळ प्रतिमेचा रंग वेगळा असतो. श्रींचा शृंगार मात्र संस्थेचे पदाधिकारी स्वत:च्या हाताने करतात. युवापिढीला या धार्मिक उपक्रमाच्या माध्यमातून आकर्षित करून आपल्या संस्कारांचे महत्त्व समजावून सांगण्याचा प्रयत्न आम्ही करतो. आतापर्यंत नागपूरचा इतिहास, गणेशाच्या जन्मापासून विवाहापर्यंतची कथा, वाघ वाचवा, सुपर हिरो आदी संकल्पनेवर सजावट करण्यात आली आहे. यात अनेक ज्ञानवर्धक दृश्येही आतापर्यंत साकारण्यात आली आहेत.
एक वर्षाच्या परिश्रमानंतर समुद्राचे दृश्य साकारून त्यात रेतीचे ३५ फूट उंच शिवलिंग निर्माण केले. त्यावेळी भाविकांना हे कसे तयार केले असावे, याचे खूप आश्चर्य वाटायचे. त्यावेळी आमच्या संकल्पनेने आम्हीच मोहरून जायचो. (प्रतिनिधी)
एक अनुभूती अशीही
चार वर्षापूर्वी आम्हाला असा भास झाला की, मूर्तिकाराने श्रींच्या सोंडेत काही बदल केला आहे. त्यावेळी जयस्वाल आपल्या पत्नीसह मूर्तिकाराकडे गेले. तोपर्यंत त्यांनी मूर्ती पाहिलेली नव्हती. पण प्रत्यक्ष मूर्ती पाहिल्यावर मात्र श्रीं.च्या सोंडेत खरेच मूर्तिकाराने बदल केलेला होता. ते पाहून जयस्वाल यांची पत्नी आश्चर्यचकित झाली.
आकर्षक स्वागतद्वार
जयस्वाल म्हणाले, दरवर्षी संस्थेतर्फे पश्चिम दिशेला नवनव्या संकल्पनेवर आकर्षक विद्युतद्वार तयार करण्यात येते. आतापर्यंत अनेक ऐतिहासिक बाबींना विद्युत संकल्पनेवर साकारण्यात आले आहे. अशा धार्मिक कार्यक्रमांना शासनाने मदत करावी, असे आवाहनही जयस्वाल यांनी केले.