Traders seek alternative to Chinese goods: Piyush Goyal | व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा : पीयूष गोयल

व्यापाऱ्यांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा : पीयूष गोयल

ठळक मुद्देविविध व्यापारी संघटनांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : देशात व्यवसायाला प्रोत्साहन देण्यासाठी उद्योजक आणि व्यावसायिकांनी चिनी वस्तूंचा पर्याय शोधावा, असे आवाहन केंद्रीय रेल्वे आणि वाणिज्य मंत्री पीयूष गोयल यांनी येथे केले. चिनी वस्तूंना भारतीय बाजारपेठांमध्ये वर्चस्व मिळू देणार नाही, असे त्यांनी सांगितले.
पीयूष गोयल यांच्या नागपूर भेटीदरम्यान भाजपा व्यापारी आघाडी आणि विविध व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याशी संवाद साधला आणि अडचणी व समस्या जाणून घेतल्या. गोयल यांनी व्यापाऱ्यांना मार्गदर्शन केले. आयोजन गुरुवारी हॉटेल सेंटर पॉईंटमध्ये करण्यात आले. मंचावर माजी खा. अजय संचेती, आ. सुधाकर कोहळे, माजी महापौर अर्चना डेहनकर आणि भाजपचे अध्यक्ष आघाडीचे अध्यक्ष संजय वाघमारे उपस्थित होते. यावेळी नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन, कोसिया, आयसीएआय नागपूर शाखा, आयएमए, होलसेल सीड्स अ‍ॅण्ड ग्रेन मर्चंट्स असोसिएशन, केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, फेडरेशन ऑफ राईस मिल्स असोसिएशन आणि अन्य व्यापारी संघटनांनी आपापल्या मागण्यांचे निवेदन गोयल यांना दिले.
गोयल म्हणाले, प्रत्येक आयात वाईट नसते आणि या पार्श्वभूमीवर राष्ट्र आणि उद्योग कसे उभे राहू शकतात, हे आपण पाहिले पाहिजे. आधुनिक युगात आसियानसारख्या व्यापारी संघटनांनी प्रादेशिक व्यापारावर अधिराज्य गाजवले आहेत. अशावेळी कोणत्याही देशाशी व्यापार कमी होणे भारताला परवडणारे नाही. त्यामुळे चिनी वस्तूंना भारतीय बाजारात रोखण्याची क्षमता निर्माण करणे आवश्यक आहे. अशावेळी टाळता येण्याजोग्या आणि अनावश्यक गोष्टींची यादी बनवावी. इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कोकिंग कोळसा आणि मोबाईलची आयात ही आजकालची गरज बनली आहे. कारण मोबाईलशिवाय आयुष्य ठप्प होते. त्याचप्रमाणे लोह उत्पादनात कोकिंग कोळसा वापरला जातो. तथापि, प्रतिबंधित वस्तूंच्या यादीमध्ये अगरबत्ती टाकल्या गेल्या आहेत कारण त्यांची आयात वितरित केली जाऊ शकते.
गोयल म्हणाले, व्यापाऱ्यांच्या एका भागासाठी महत्त्वाची असणारी एखादी वस्तू दुसऱ्या भागाला नसू शकते. म्हणूनच व्यापारी त्या विशिष्ट वस्तूंच्या आयातीवर बंदी आणू इच्छितात. पण ग्राहकांच्या हितासह सर्व व्यापाऱ्यांचे हित सरकार पाहते. गोयल यांनी निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर व्यापाऱ्यांच्या मागण्यांकडे लक्ष देण्याचे मान्य केले. छोट्या आणि अर्थपूर्ण सूचना दिल्याबद्दल नागपुरातील व्यापाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले.
प्रामाणिक कर भरणा करणाऱ्यांना त्रास दिला जाणार नाही आणि कॉपोर्रेट कर दरात कपात केल्याने महसूल वाढीसाठी कर वसुलीचे लक्ष्य निश्चित केल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी एनव्हीसीसीचे हेमंत गांधी, कामितचे दीपेन अग्रवाल, कोसियाचे जुल्फेश शाह, व्हीआयएचे नरेश जाखोटिया, व्हीटीएचे तेजिंदरसिंग रेणू, केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे मुकुंद दुबे, आयसीएआयचे सुरेन दुरुगकर, सोना-चांदी ओळ कमिटीचे पुरुषोत्तम कावळे व राजेश रोकडे, आयएमएचे डॉ संजीव देशपांडे आणि व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संचालन आणि आभार संजय भेंडे यांनी मानले.

 

Web Title: Traders seek alternative to Chinese goods: Piyush Goyal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.