निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांचा हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2021 04:08 IST2021-07-26T04:08:16+5:302021-07-26T04:08:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनच्या नुकसानीतून अद्यापही बाहेर न पडलेल्या व्यापारी वर्गाचे प्रशासनाच्या निर्बंधांमुळे आर्थिक कंबरडे मोडले ...

Traders attack against restrictions | निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांचा हल्लाबोल

निर्बंधांविरोधात व्यापाऱ्यांचा हल्लाबोल

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : कोरोनाच्या लॉकडाऊनच्या नुकसानीतून अद्यापही बाहेर न पडलेल्या व्यापारी वर्गाचे प्रशासनाच्या निर्बंधांमुळे आर्थिक कंबरडे मोडले आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता नियंत्रणात आली असतानादेखील प्रशासनाने अटी शिथिल केलेल्या नाहीत. त्यामुळे व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण असून, त्यांनी विविध माध्यमांतून प्रशासनाविरोधात हल्लाबोल पवित्रा घेण्याचा निर्णय घेतला आहे. याअंतर्गत शहरात आंदोलने करण्यात येणार असून, न्यायालयातदेखील दाद मागण्यात येणार आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनंतर शासनाने निर्बंध लावले व अनेक आठवड्यांपासून सोमवार ते शुक्रवार दुपारी ४ वाजेपर्यंतच दुकाने उघडी राहत आहेत. यामुळे व्यापाऱ्यांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत असून, बाजारपेठेवरदेखील याचा परिणाम होत आहे. निर्बंध हटावेत यासाठी व्यापाऱ्यांनी ‘सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ’ संघर्ष समिती स्थापन केली आहे. या समितीच्या बॅनरअंतर्गत पुढील काही दिवस व्यापारी रस्त्यांवर उतरून सरकार व प्रशासनासमोर व्यथा मांडणार आहेत. जर त्यात दिलासा मिळाला नाही, तर न्यायालयात दाद मागण्यात येणार आहे.

आज पदयात्रा, तर उद्या बाइक रॅली

यासंदर्भात संघर्ष समितीचे संयोजक दीपेन अग्रवाल, सहसंयोजक दिलीप कामदार, सचिव तेजिंदरसिंह रेणू यांनी पत्रपरिषदेत व्यापाऱ्यांची भूमिका मांडली. कोरोनाकाळात व्यापाऱ्यांनी प्रशासनाला सहकार्य केले. नागपुरात बाधित कमी असताना निर्बंध ठेवणे हा व्यापाऱ्यांवर अन्यायच आहे. खाद्य, पर्यटन, लॉन, मंगल कार्यालय इत्यादी उद्योगांना प्रचंड फटका बसतो आहे. सरकारला जागे करण्यासाठी सोमवार २६ जुलै रोजी सायंकाळी ४ वाजता संविधान चौक ते जिल्हाधिकारी व मनपा कार्यालयापर्यंत पदयात्रा काढली जाईल. २७ जुलै रोजी दुपारी १ वाजता हिस्लॉप महाविद्यालयासमोरून कार-बाइक रॅली काढण्यात येईल. लाॅ काॅलेज चाैक, शंकरनगर चाैक, झाशी राणी चाैक, पंचशील चाैक, मेहाडिया चाैक, ग्रेट नाग राेड, गंगाबाई घाट चाैक, टेलिफाेन एक्स्चेंज चाैक, अग्रसेन चाैक, मेयाे हाॅस्पिटल चाैक, मानस चाैक, माॅरेस काॅलेज टी- पॉइंट व व्हेरायटी चौक, असा रॅलीचा मार्ग असेल.

‘हल्लाबाेल’मध्ये २२ नेत्यांना सांगितली व्यथा

संघर्ष समितीच्या पदाधिकाऱ्यांनी रविवारी हल्लाबोल आंदोलन केले. याअंतर्गत शहरातील २२ राजकीय नेत्यांची पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व व्यापाऱ्यांची व्यथा मांडली. राज्य सरकारवर दबाव आणावा, अशी मागणीदेखील करण्यात आली, असे समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

संघर्ष समितीत २३ व्यापारी संघटनांचा समावेश

‘सरकार जगाओ, वाणिज्य बचाओ’ संघर्ष समितीत शहरातील २३ व्यापारी संघटनांचा समावेश आहे. यात असाेसिएशन ऑफ काेचिंग इन्स्टिट्यूटस्‌, चेंबर ऑफ असाेसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्रीज अ‍ॅण्ड ट्रेड, कंझ्युमर प्राॅडक्टस डिस्ट्रिब्युटर्स असाेसिएशन, नागपूर कस्टम हाउस एजंटस्‌ असाेसिएशन, नागपूर इटरी ओनर्स असाेसिएशन, नागपूर हाेटल ओनर्स असाेसिएशन, नागपूर मंगल कार्यालय लाॅन असाेसिएशन, नागपूर फाेटाेग्राफर्स अ‍ॅण्ड ड्राेन असाेसिएशन, नागपूर रेसिडेन्शिअल हॉटेल्स असाेसिएशन, नागपूर शिपिंग लाइन्स एजंटस्‌ असाेसिएशन, नागपूर टेंट हाउस असाेसिएशन, नागपूर जिल्हा रेस्टाॅरेंट परमिट रूम असाेसिएशन, स्टील अ‍ॅण्ड हार्डवेयर चेंबर ऑफ विदर्भ, टीआईई नागपूर, ट्रॅव्हल्स असाेसिएशन ऑफ नागपूर, विदर्भ अ‍ॅम्युझमेन्ट अ‍ॅण्ड वाॅटर पार्क असाेसिएशन, विदर्भ बॅकस्टेज असाेसिएशन, विदर्भ कॉम्प्युटर अ‍ॅण्ड मीडिया डीलर्स वेल्फेअर असाेसिएशन, विदर्भ जनरेटर ओनर्स असाेसिएशन, विदर्भ एलईडी असाेसिएशन, विदर्भ लाइट ओनर्स असाेसिएशन, विदर्भ पेन अ‍ॅण्ड स्टेशनर्स असाेसिएशन, विदर्भ वाइन मर्चंटस्‌ असाेसिएशन यांचा सहभाग आहे.

Web Title: Traders attack against restrictions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.