लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : जानेवारीत मका वगळता कापूस व सोयाबीनचे दर एमएसपीच्या वर गेले होते. ही तेजी केवळ १५ दिवस राहिली. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात या दोन्ही पिकांचे दर पुन्हा एमएसपीच्या खाली आले. दरातील ही घसरण ७ ते १० टक्क्यांची असून, हा भारत-अमेरिका दरम्यानच्या 'ट्रेड डील'चा भारतीय शेतमाल बाजारावर झालेला 'सायकॉलाजिकल इफेक्ट' आहे.
खरीप पणन हंगाम सुरू होताच ऑक्टोबर ते डिसेंबर या तीन महिन्यांत कापूस, सोयाबीन, मक्यासह अन्य शेतमालाचे दर एमएसपीपेक्षा कमी होते. सरकारने तांत्रिक अडचणी निर्माण करून एमएसपी दराने शेतमाल खरेदी करण्यास दिरंगाई केल्याने अनेकांनी दरवाढीच्या अपेक्षेने विक्री करणे टाळले होते.
जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यानंतर कापसाचे कमाल दर प्रतिक्विंटल ८,६०० व सरासरी दर ८,३०० रुपये आणि सोयाबीनचे दर कमाल दर ५,८०० रुपये, तर सरासरी दर ५,५०० रुपयांपर्यंत पोहोचले होते. या काळात मक्याचे दर मात्र कायम एमएसपीच्या खाली होते, ते आजही कायम आहे.
फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ट्रेड डीलची देशभर चर्चा सुरू झाली आणि कापसाचे कमाल दर प्रतिक्विंटल ७,९५० रुपये तर सरासरी दर ७,७०० रुपये आणि सोयाबीनचे कमाल दर ५,३०० रुपये व सरासरी दर ४,८५० रुपयांपर्यंत खाली आले आहेत. या दोन्ही शेतमालाच्या दरातील ही घसरण सरासरी ७ ते १० टक्के आहे. त्यातच सरकारने एमएसपी दराने शेतमालाची खरेदी बंद केल्यागत असल्याने या 'सायकॉलॉजिकल इफेक्ट'मुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
भारतीय शेतमाल बाजार अतिसंवेदनशील
शेतमाल दरवाढीच्या पावत्या सोशल मीडियावर व्हायरल होताच बाजारात त्या शेतमालाची आवक वाढून दर दबावात येतात.केंद्र सरकारच्या एखाद्या निर्णयाचे पत्र अथवा विचाराधीन निर्णय व्हायरल होताच दर घसरायला किंवा वधारायला सुरुवात होते, हे अनुभव दरवर्षी येतात. यावरून भारतीय शेतमाल बाजारपेठ अतिसंवेदनशील असल्याचे स्पष्ट होते. ट्रेड डीलचाही असाच परिणाम बाजारावर झाला आहे.
प्रक्रिया उद्योजकांचा आखडता हात
- या ट्रेड डीलच्या चर्चेमुळे देशातील शेतमाल प्रक्रिया उद्योजकांनी आयात वाढण्याच्या भीतीमुळे सोयाबीनसह इतर तेलबियांचे दर व खरेदी कमी केली.
- त्यामुळे सोयाबीन व सरकीचे दर घसरले. सरकीच्या दरातील घसरणीमुळे कापसाचे दर उतरले आहेत.
- या उद्योजकांना सोयाबीन तेल व पशुखाद्याच्या शुल्कमुक्त आयातीची व त्यांच्या आर्थिक नुकसानीची भीती वाटत आहे.
- इथेनॉल व पशुखाद्य उद्योगांकडून भरीव मागणी नसल्याने मक्याचे दर कायम दबावात आहेत.
- भारताच्या तुलनेत जागतिक ५ बाजारात मक्याचे दर कमी असल्याने आयातीचा धोकाही उद्योजकांना वाटत आहे.
Web Summary : Cotton and soybean prices fell below MSP after a brief January rise due to trade deal fears. Prices dropped 7-10%, hurting farmers as government procurement stalled. Processors fear imports, impacting oilseed prices.
Web Summary : व्यापार समझौते के डर से जनवरी में थोड़ी वृद्धि के बाद कपास और सोयाबीन की कीमतें एमएसपी से नीचे गिर गईं। कीमतों में 7-10% की गिरावट आई, जिससे किसानों को नुकसान हुआ क्योंकि सरकारी खरीद रुक गई। प्रोसेसर को आयात का डर है, जिससे तिलहन की कीमतों पर असर पड़ रहा है।