पर्यटकांची पावले पेंचच्या सिल्लारी गेटकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 04:23 IST2021-01-08T04:23:58+5:302021-01-08T04:23:58+5:30
नागपूर : अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर वनपर्यटनाकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. अशातच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटकडे व्याघ्रदर्शनाची हमाखास ...

पर्यटकांची पावले पेंचच्या सिल्लारी गेटकडे
नागपूर : अनलॉकची प्रक्रिया सुरू केल्यानंतर वनपर्यटनाकडे लोकांचे आकर्षण वाढले आहे. अशातच पेंच व्याघ्र प्रकल्पाच्या सिल्लारी गेटकडे व्याघ्रदर्शनाची हमाखास संधी मिळत असल्याने या भागात पर्यटकांचा ओढा वाढल्याचे दिसत आहे. ऑक्टोबरमध्ये वनपर्यटन सुरू झाल्यापासून तीन महिन्यात सिल्लारी गेटकडून ९०४८ पर्यटकांनी भेट दिली. उन्हाळ्यापर्यंत हीच परिस्थिती राहणार असल्याने वनविभागासह गाईड्स व स्थानिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्य शासनाने १ ऑक्टोबरपासून वनपर्यटनाला परवानगी दिली. पेंच व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या वाढल्याने त्याचा फायदा विभागाला मिळत आहे. सुरुवातीला पर्यटकांची संख्या कमी हाेती पण त्यानंतर वाढायला लागली. पेंचच्या सिल्लारी व खुर्सापार गेटकडून वाघांची सायटिंग चांगली असल्याने व्याघ्रप्रेमींचा ओढा या गेटकडे वाढल्याचे दिसून येते. तीन महिन्यात ९०४८ पर्यटकांसह २८९५ वाहनांचे (जिप्सी) संचालन झाले. यामधून वनविभागाला प्रवेश शुल्कातून १६.८१ लक्ष, ऑनलाइन बुकिंगद्वारे ११.६४ लक्ष तर कॅमेऱ्यासह इतर आवकसहित २९.४६ लक्ष रुपयांचा महसूल प्राप्त झाला.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या मते, पर्यटकांची संख्या वाढल्याने वाघांच्या हालचालीत वाढ झाली आहे. त्यामुळे पर्यटकांमध्ये उत्साह आहे. विशेष म्हणजे लाॅकडाऊनच्या निराशाजनक परिस्थितीनंतर स्थानिक जिप्सीचालक-मालक, गाइड्स व व्यावसायिकांचा राेजगार वाढल्याने त्यांच्यातही आनंदाचे वातावरण आहे. पेंचच्या सातही गेटमधून तीन महिन्यात २०,१८२ पर्यटकांनी भेट दिल्या असून ८४ लक्षांहून अधिकचा महसूल वनविभागाला प्राप्त झाला आहे.
पेंचच्या परिसरात ५३ वाघ, ६० हून अधिक बिबट व इतर प्राणी आहेत. नियाेजनातून चांगले काम हाेत आहे व समन्वयातून स्थानिकांची विश्वासार्हता वाढत आहे. दरराेजचे बुकिंग वाढत आहे. पर्यटन वाढीचा फायदा स्थानिकांना मिळत असल्याने त्यांच्यात आनंद आहे.
- अतुल देवकर, एसीएफ, पेंच व्याघ्र प्रकल्प
लाॅकडाऊनच्या काळात राेजगार नसल्याने माेठ्या संकटाचा सामना करावा लागला. आता सिल्लारी गेटवर पर्यटकांची संख्या वाढली आहे. उन्हाळ्यापर्यंत चांगली परिस्थिती राहील, अशी आशा आहे.
- दुर्गेश उरकुडे, गाईड
पेंचच्या इतर गेटमधली परिस्थिती
गेट पर्यटक वाहने प्रवेश शुल्क महसूल ऑनलाईन बुकिंग इतरसह एकूण महसूल
खुर्सापार ६५६७ १७८० ६.६२ लक्ष १०.९८ लक्ष १८.८२ लक्ष
काेलितमारा ९०२ ३२६ ७४ हजार ६० हजार १.३४ लक्ष
चाेरबाहुली १७५४ ४५१ ३.२१ लक्ष १.४९ लक्ष ४.३९ लक्ष
साेलेघाट ७३९ २४० २.३२ लक्ष २२.०८ लक्ष २४.४३ लक्ष
सुरेवाही १११३ २६९ २.८० लक्ष २.७० लक्ष ५.५२ लक्ष