किशोर बागडे
नागपूर : अवघे १५ वर्षे वय असलेली स्थानिक सुपर मॉडेल तोशी अनिल कोटांगळे हिने ‘मिस इंडिया इंटरनॅशनल’ हा सन्मान जिंकला आहे. थायलंडच्या पटाया शहरात नुकत्याच झालेल्या प्राईड ऑफ इंडिया इंटरनॅशनल या आयोजनात भारतासह आशियातील २५ देशांमधील मॉडेल सहभागी झाल्या होत्या.‘मिस विदर्भ’, ‘मिस महाराष्ट्र’ आणि त्यानंतर नवी दिल्लीत झालेल्या स्पर्धेत ‘मिस टीन इंडिया २०२४’ स्पर्धा जिंकल्यानंतर तोशीने आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कामगिरीचा ठसा उमटविला आहे.
२०१० ला जन्मलेली तोशी सध्या कामठी रोडवरील मेरी पुसपीन अकादमी येथे आयसीएसएई बोर्ड दहावीची विद्यार्थिनी आहे. प्राथमिक फेरीनंतर मुख्य फेरीत अनेक देशांच्या प्रतिस्पर्धी मॉडेलसह भारतीय प्रतिस्पर्ध्यांना मागे टाकून तोशीने विजेतेपदाचा मुकुट जिंकला. ‘आपल्याला उच्च शिक्षणासोबतच मॉडेलिंग क्षेत्रात भारताचे नाव उंचावायचे आहे,’ अशी प्रतिक्रिया विजेती बनल्यानंतर तोशीने दिली. आपल्या यशात आई हर्षल, वडील अनिल, भाऊ श्लेष याच्यासह आजोबा विठोबाजी आणि आजी हेमलता यांचा मोलाचा वाटा असल्याचे तिने सांगितले.
तोशीच्या यशाबद्दल आ. डॉ. नितीन राऊत, सुमेधा राऊत,ॲड. अनिल ठाकरे, निर्मला भागवत यादव, वंदना नरेशसिंग ठाकूर,सुप्रिया कुमार मसराम, प्राची किशोर बागडे यांच्यासह अनेक चाहत्यांनी तिचे अभिनंदन केले आहे.