अश्लील चित्रफित तयार करून परिचारिकेवर अत्याचार

By Admin | Updated: June 22, 2017 02:23 IST2017-06-22T02:23:49+5:302017-06-22T02:23:49+5:30

शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर अश्लील चित्रफित तयार करून एका आरोपी डॉक्टरने परिचारिकेचे शोषण केल्याची घटना पुढे आली आहे.

Torture at nursing by creating pornography | अश्लील चित्रफित तयार करून परिचारिकेवर अत्याचार

अश्लील चित्रफित तयार करून परिचारिकेवर अत्याचार

आरोपी डॉक्टरला अटक : अडीच महिन्यांपासून करीत होता शोषण
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : शीतपेयातून गुंगीचे औषध दिल्यानंतर अश्लील चित्रफित तयार करून एका आरोपी डॉक्टरने परिचारिकेचे शोषण केल्याची घटना पुढे आली आहे. अडीच महिन्यापासून शोषणाची बळी ठरलेल्या परिचारिकेने दिलेल्या तक्रारीवरून बजाजनगर पोलिसांनी आरोपी डॉक्टरला अटक केली आहे.
शेखर सूर्यभान तायडे (३२) रा. हिंगणा असे या आरोपी डॉक्टरचे नाव आहे. शेखरने बीएएमएस केले आहे. तो बजाजनगरच्या सिम्स हॉस्पिटलमध्ये निवासी वैद्यकीय अधिकारी (आरएमओ) आहे. पीडित युवती परिचारिका आहे. ती रुग्णालयाच्या वसतिगृहात राहते.
युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार शेखरने स्वत:ला अविवाहित असल्याचे सांगून या युवतीशी मैत्री केली. शेखरने तिला लग्नाचे वचन दिल्यामुळे ती त्याच्या जाळ्यात अडकली. एप्रिल महिन्यात शेखर युवतीला बजाजनगरच्या एका धार्मिक स्थळी घेऊन गेला. तेथे त्याने तिला शीतपेय पाजले. शीतपेय पिताच युवतीला गुंगी येऊ लागली. शेखरने तिला वसतिगृहात सोडण्याच्या बहाण्याने आपल्या घरी नेले. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार करतानाची चित्रफित तयार केली. त्यानंतर ही चित्रफित दाखवून तो वेळोवेळी तिच्यावर अत्याचार करीत होता. मनाई केल्यास चित्रफित व्हायरल करण्याची धमकी तो तिला देत होता. यामुळे ही परिचारिका घाबरली. ती येथे एकटीच राहते. अविवाहित असल्यामुळे बदनामीच्या भीतीने ती शेखरचा अत्याचार सहन करीत होती.
शेखरच्या अत्याचारामुळे त्रस्त झाल्यामुळे युवती त्याच्यापासून चार हात दूर राहू लागली. यामुळे शेखर संतापला. तो तिच्यावर शारीरिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी दबाव टाकू लागला. नुकतेच या युवतीचे लग्न ठरले आहे. शेखरने या युवतीच्या भावी पतीला अश्लील चित्रफित पाठविल्यामुळे तिचे लग्न मोडले. त्यानंतर या युवतीने बजाजनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला. पोलिसांनी बलात्काराचा गुन्हा दाखल करून आरोपी शेखरला अटक केली. पोलिसांनी त्याच्याजवळून अश्लील चित्रफितही ताब्यात घेतली आहे. यापूर्वीही त्याने अशा युवतींवर अत्याचार केल्याची शंका आहे. पोलिसांनी २५ जूनपर्यंत त्याची कोठडी मिळविली आहे.

Web Title: Torture at nursing by creating pornography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.