लोकमत न्यूज नेटवर्क
उमरेड : कोरोनाने जगणे शिकविले. मरणही जवळून दाखविले. या जगण्या-मरण्याच्या लढाईत बहुसंख्य सहीसलामत आयुष्याची नवी सुरुवात करीत आहेत. या सुख-दु:खाच्या कालावधीत कोरोनाबाधित रुग्णांना चाचणी, तपासणी, तसेच औषधोपचारासाठी साधी रुग्णवाहिकासुद्धा उपलब्ध होऊ शकत नाही. अवाच्या सव्वा पैसा मोजूनही तासन्तास प्रतीक्षा करावी लागत आहे. दुसरीकडे एकमेव शववाहिका परिसरात रात्रं-दिवस आपली सेवा प्रदान करीत आहे. अशा अत्यंत कठीण परिस्थितीत सामाजिक दायित्वाचा वसा जोपासणाऱ्या उमरेडनगरीत एखाद्या सेवाभावी रुग्णवाहिकेची नितांत गरज आहे. शव नेण्यासाठी एकमेव शववाहिका या परिसरात असून, जिवंतपणी तातडीने औषधोपचारासाठी अन् मृत्यूनंतरही सोयीसुविधा मिळविण्यासाठी यातनाच सोसाव्या लागत आहेत.
उमरेड शहराची लोकसंख्या ५० हजारांच्या पलीकडे गेली आहे. १९२ गावांची लोकसंख्या असलेल्या या तालुक्यात भिवापूर आणि कुही तालुक्यातील असंख्य गावकऱ्यांना उमरेडशिवाय पर्याय नाही. अशावेळी शहरात केवळ एकमेव शववाहिका उपलब्ध आहे. सोबतच चार रुग्णवाहिकासुद्धा खासगी स्तरावर इथे उपलब्ध आहेत. ऑक्सिजनयुक्त असलेल्या रुग्णवाहिकेचे दर आकाशाला भिडलेले दिसतात. ८ ते १२ हजार मोजावे लागतात. अशावेळी गोरगरिबांची निराशा करणारी ही संपूर्ण यंत्रणा ठरत आहे.
याबाबत रुग्णवाहिकेची सेवा प्रदान करणाऱ्या काही चालक आणि त्यांच्या मालकांशी संवाद साधला. आम्हीही माणसेच आहोत. जोखमीचा जीवघेणा प्रवास, दवाखाने-व्हॉस्पिटलमध्ये तासन्तास प्रतीक्षा, चाचणीसाठी आणि बेड मिळविण्यासाठी इकडूनतिकडे फिरावे लागते. शिवाय सुरक्षिततासुद्धा महत्त्वाची असल्याने किट घालूनच हा संपूर्ण प्रवास करावा लागतो, अशा प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. कमी खर्चात तातडीची सेवा प्रदान करणारी रुग्णवाहिका या परिसरात एक नव्हे दोन हव्या आहेत, तरच गोरगरीब-सर्वसामान्यांचे लाखमोलाचे प्राण वाचविता येतील.
.....
कोण घेणार पुढाकार?
उमरेडनगरी ही शांत-संयमी आहे. असे असले तरी आपल्या न्याय्य-हक्कासाठी रस्त्यावर येण्यासही जनताजनार्दन मागेपुढे बघत नाही. खोटे-नाटे रेटून बोलणेही येथे खपत नाही. एका झटक्यात मदतीसाठी असंख्य हात विश्वासावर हमखासपणे सोबतीला येतात. अनेक संस्थांचे जाळेसुद्धा या परिसरात पसरले आहे. आता कोरोनाच्या विपरीत परिस्थितीत रुग्णवाहिका आणि शववाहिका यासाठी पुढाकार कोण घेणार, असा सवाल जनमानसात विचारला जात आहे.