भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अत्याचार
By Admin | Updated: January 14, 2017 02:40 IST2017-01-14T02:40:35+5:302017-01-14T02:40:35+5:30
भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा

भविष्य सांगण्याच्या बहाण्याने अत्याचार
नागपूर : भविष्य सांगण्याच्या बहाण्याने एका विद्यार्थिनीला बेशुद्ध करून तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे. अमरीश शर्मा (३५) रा. फालके ले-आऊट फ्रेण्ड्स कॉलनी असे आरोपीचे नाव आहे.
पीडित युवती बारावीची विद्यार्थिनी आहे. शर्मा हा फुटाळा चौपाटीवर चायनीज सेंटर चालवतो. विद्यार्थिनीच्या मैत्रिणीशी त्याची ओळख आहे. विद्यार्थिनीच्या तक्रारीनुसार शर्मा हा हस्तरेषा पाहून भविष्य सांगत असल्याचे माहीत झाले तेव्हा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ती त्याच्या संपर्कात आली. दोन ते तीन वेळा ती शर्मा याला भेटली. आपल्या बोलण्याने शर्माने तिला संमोहित केले. तक्रारीनुसार रविवारी ८ जानेवारी रोजी शर्माने तिला फोन करून सदरच्या पुनम चेंबरजवळ बोलावले. दुपारी १ वाजता ती पुनम चेंबरजवळ पोहोचली. तिथे आपली दुचाकी ठेवून ती त्याच्या कारमध्ये बसली. शर्माने जवळपास तासभर तिच्याशी बोलत तिला सदर व मानकापूर परिसरात फिरवले. यादरम्यान तिने शर्माला पाणी मागितले. पाणी पिताच ती बेशुद्ध होऊ लागली. शर्मा तिला शहराबाहेर नेऊ लागला. याबाबत विचारले असता मित्राला भेटायचे असल्याचे सांगितले.
शर्माने विद्यार्थिनीला अमरावती रोडवरील एका रिसॉर्टमध्ये नेले. रिसॉर्टमध्ये पोहोचल्यावर तिने पुन्हा पाणी मागितले. पाणी पिल्यावर ती पुन्हा बेशुद्ध झाली. यानंतर शर्माने तिच्यावर अत्याचार केला. काही वेळानंतर शुद्धीवर आल्यावर तिला घडलेला प्रकार लक्षात आला. याबाबत कुणालाही काही सांगू नको असे शर्माने सांगितले. यानंतर सायंकाळी ५ वाजता तिला पुन्हा पुनम चेंबरजवळ आणून सोडले.
पीडित विद्यार्थिनीने आपल्या मित्राला आपबिती सांगितली. मित्राने शर्माला याबाबत जाब विचारला. तेव्हा शर्माने त्याला धमकावले आणि याबाबत कुणाला काही न सांगण्याची ताकीद दिली. पीडित विद्यार्थिनी बुधवारी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करायला गेली. परंतु गिट्टीखदान पोलिसांनी तिला सदर पोलीस ठाण्यात पाठवले. सदर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. शर्मा मात्र त्याच्यावरील आरोप नाकारत आहे. त्याचे म्हणणे आहे की, विद्यार्थिनीसोबत त्याची पुनम चेंबरजवळ भेट झाली. तेथून ते जमीन पाहण्यासाठी अमरावती रोडवर गेला होता. विद्यार्थिनी त्याला फसवित असल्याचा त्याचा आरोप आहे. शर्माला १६ जानेवारीपर्यंत कोठडीत घेण्यात आले आहे. (प्रतिनिधी)