मोरूच्या मावशीचा रंगमंचावर टाँग टिंग टिंगा....
By Admin | Updated: July 7, 2014 01:10 IST2014-07-07T01:10:56+5:302014-07-07T01:10:56+5:30
आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त विनोदी लेखणीतून अवतरलेले नाट्य म्हणजे ‘मोरूची मावशी...’ या नाटकाला रंगमंचावर ५० वर्षे झालीत पण त्यातले शाब्दिक विनोद प्रत्येक पिढीला भुरळ घालतात.

मोरूच्या मावशीचा रंगमंचावर टाँग टिंग टिंगा....
लोकमत सखी मंच : कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे आयोजन
नागपूर : आचार्य अत्रे यांच्या सिद्धहस्त विनोदी लेखणीतून अवतरलेले नाट्य म्हणजे ‘मोरूची मावशी...’ या नाटकाला रंगमंचावर ५० वर्षे झालीत पण त्यातले शाब्दिक विनोद प्रत्येक पिढीला भुरळ घालतात. फारसा अंगविक्षेप करून विनोद निर्मितीचा अट्टाहास नसलेले परिस्थितीसापेक्ष आणि भाषिक विनोद असलेल्या या दर्जेदार नाटकाने भरगच्च भरलेल्या सभागृहाला हास्याच्या धबधब्यात चिंब केले. अत्रे यांचा विनोद, मंगेश कदम यांचे कुशल दिग्दर्शन आणि भरत जाधव यांची ‘मोरूची मावशी’ एकदम ‘सहि रे सहि’ दाद द्यायला लावणारी होती. मोरूच्या मावशीने रंगमंचावर केलेला ‘टाँग टिंग टिंगा...’ गच्च भरलेल्या प्रेक्षकांची ‘नॉनस्टॉप’ हसवणूक करणारा होता.
लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने या नाटकाचा एक प्रयोग डॉ. वसंतराव देशपांडे सभागृहात आयोजित करण्यात आला. सुयोग प्रकाशित आणि रसिकरंजन निर्मित मोरूच्या मावशीने धम्माल केली. नाटकातील कलावंतांना टाळ्यांची दाद देत सखी मंचच्या सदस्य आणि प्रेक्षकांनी हा प्रयोग एन्जॉय केला. बापुराव माने आणि त्यानंतर विजय चव्हाण यांनी मोरूची मावशी साकारली होती. गेली ५० वर्षे या नाटकाचे महाराष्ट्रात प्रयोग होत आहेत. त्यामुळे विजय चव्हाण यांना पाहिलेले अनेक प्रेक्षक पुन्हा या प्रयोगाला केवळ भरत जाधवचा अभिनय पाहण्यासाठी आले होते. नाटक सुरू असताना सभागृहात ‘फुल्ल लॉफ्टर’ सुरू असल्याने हसणे थांबेपर्यंत कलावंतांना ‘पॉज’ घ्यावा लागत होता.
भय्या आणि मोरु हे दोन कॉलेजकुमार. दोघेही जरा उडाणटप्पू आणि घरासमोरच्या दोन मुलींना गटविण्याचा विचार करणारे. या दोन मुली म्हणजे महापौर टोणगे यांच्या दोन पुतण्या आहेत. भय्याचे काका कर्नल डोंगरे यांच्या आर्थिक पाठबळावर दोघेही एका बंगल्यात राहतात. मोरूची मावशी ही कांदा संस्थानची राणी. भय्या उषासाठी आणि मोरू निशासाठी झुरत असतात पण त्यांचा या दोघींशीही फारसा संबंध येत नाही. त्यात एक दिवस अचानक मोरूची मावशी मोरूला भेटण्यासाठी येणार असल्याची तार येते. हे निमित्त साधून सगळ्यांची एकत्रित भेट घालावी आणि एकत्र जेवण करावे, असा बेत भय्या आणि मोरु आखतात. पण कांदा संस्थानची राणी असलेली मोरूची मावशी आज येणार नसल्याची तार ऐनवेळी येते.
एव्हाना साराच बेत ठरलेला असतो आणि समोर राहणाऱ्या उषा, निशानेही मावशीसोबत जेवण घेण्याचे मान्य केले असते. काय करावे, हा विचार करताच भय्या आणि मोरुचा मित्र नाट्यकलावंत बंड्या तेथे येतो. बंड्या नाटकात स्त्रीवेश करणाराही कलावंत असतो. सारा बेत फिस्कटण्यापेक्षा बंड्यालाच स्त्रीवेशात कांदा संस्थानची राणी म्हणून येण्याचे साकडे दोघेही घालतात. मोठ्या प्रयत्नाने बंड्या मित्रांसाठी तयार होतो. सारेच भोजनासाठी एकत्रित येतात. पण त्याचवेळी मोरुची कांदा संस्थानची राणी मोरुची मावशीही तेथे येते. पण आधीच तेथे मोरुची मावशी असल्याचे पाहून ती गप्प राहते. मोरुच्या खऱ्या मावशीसमोर मोरुच्या खोट्याच मावशीचा खेळ सुरू राहतो. त्यात कर्नल डोंगरे अविवाहित आणि महापौर टोणगेही मोरुच्या मावशीच्या प्रेमात पडतात. साराच गोंधळ रंगमंचावर तुफान हास्य निर्माण करतो. यात मोरुच्या मावशीची भूमिका साकारताना भरत जाधवने मजा आणली. परफेक्ट टायमिंग आणि विनोदाचे पंच भरतने नेमकेपणाने हेरल्याने योग्य पद्धतीने विनोदनिर्मिती रसिकांना बांधून ठेवण्यात कमालीची यशस्वी झाली आहे. प्रदीप मुळ्ये यांचे नेपथ्य आणि अशोक पत्की यांच्या संगीताने हा साराच गोंधळ आनंददायी झाला आहे. सर्वच कलावंतांनी यात जीव ओतून भूमिकेला न्याय दिला आहे. (प्रतिनिधी)
अभिनेता भरत जाधव यांचे स्वागत
नाटकाच्या प्रारंभी लोकमत सखी मंच आणि कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानच्यावतीने अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी लोकमतचे तांत्रिक सल्लागार रमेश बोरा यांनी कुसुमताई बोदड लोकसेवा प्रतिष्ठानचे शशिकांत आणि आरती बोदड यांचे स्वागत केले. यानंतर अभिनेता भरत जाधव यांचा सत्कार शशिकांत बोदड यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत त्याला प्रतिसाद दिला. काहींनी उभे राहूनही भरत जाधवचा सन्मान केला. या समारंभाचे निवेदन लोकमत सखी मंच संयोजिका नेहा जोशी यांनी केले.