लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : १० दिवसांनंतर समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये वाढ होणार आहे. परिणामी टोलची रक्कम आणि वाहनाच्या इंधनाच्या खर्चाचा हिशेब बघता खासगी वाहनांची संख्या 'समृद्धी'वरून कमी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
१ एप्रिल २०२५ पासून समृद्धी महामार्गावरील टोलदर वाढणार आहेत. टोलवाढीचा हा फटका जोरदारच आहे. केवळ टोल आणि तिकीट दरांची तुलना केली तरी शयनयान श्रेणीतील रेल्वेचा प्रवास अधिक फायद्याचा ठरणार आहे. कारण दरवाढीनंतर समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी खासगी वाहनधारकाला नागपूर ते मुंबई असा प्रवास करताना १,४४५ टोल द्यावा लागणार आहे. याशिवाय, इंधन खर्च आणि वाहनाच्या देखभालीचा खर्च वेगळा राहील अशा स्थितीत रेल्वेचा पर्याय अधिक वापरला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही.
अशी आहे तफावतवातानुकूलित श्रेणीतील रेल्वे प्रवासाचा खर्च समृद्धी महामार्गाच्या टोलपेक्षा थोडा कमी-जास्त नागपूरवरून मुंबईला जाण्यासाठी वातानुकूलित श्रेणीतील तृतीय श्रेणी रेल्वेचे कमीत कमी भाडे हे ११२५ रुपये पासून सुरू होते. विदर्भ, ज्ञानेश्वरीसारख्या इतर एक्स्प्रेस १२१० तर दुरांतो एक्स्प्रेसचे भाडे हे १८९० आहे. तर, शयनयान श्रेणीतील तिकीट ६८५ रुपये आहे. वाहनाचे इंधन, देखभाल आणि इतर खर्च विचारात घेतल्यास, रेल्वे प्रवासच अधिक किफायतशीर ठरू शकतो. हा हिशेब अनेक खासगी वाहनधारकांना रेल्वे गाडीत बसण्यास बाध्य करणारा ठरू शकतो.
असे राहील नवीन टोल दर: कार आणि हलकी मोटार वाहने (एलएमव्ही) : प्रति किलोमीटर २.०६ रुपये
- मिनी ट्रक आणि मिनी बस: प्रति किलोमीटर ३.३२ रुपये
- चार किंवा सहा चाकांच्या बस आणि ट्रक प्रति किलोमीटर ६.९७ रुपये
- जेसीबी, ट्रेलर आणि बांधकामासाठी वापरली जाणारी वाहने: प्रति किलोमीटर १०.९३ रुपये
- सात किंवा त्याहून अधिक एक्सेल असलेली वाहने : प्रति किलोमीटर १३.३०
- हे दर १ एप्रिल २०२५ पासून ३१ मार्च २०२८ पर्यंत लागू राहतील.
प्रवाशांनाही बसणार फटका
- संपूर्ण ७०१ किमी लांबीच्या महामार्गावर प्रवास करणाऱ्या मोटार वाहनांसाठी एकूण टोल साधारणतः १,४४५ रुपये राहील.
- टोल दरवाढीची ही रक्कम व्यावसायिक वाहतूकदार स्वतःच्या खिशांतून भरणार नाही. ते तिकिटांची दरवाढ करतील.
- अर्थात बस, ट्रॅव्हल्सने प्रवास करणाऱ्यांनाही या टोलवाढीचा फटका बसणार आहे.