टोल नाक्यावर हत्या
By Admin | Updated: July 15, 2014 01:20 IST2014-07-15T01:20:09+5:302014-07-15T01:20:09+5:30
टोल नाक्यावर वसुलीसाठी ठेवलेल्या गुंडांनी वाद सोडवण्यासाठी आलेल्या एका गुन्हेगार कम प्रॉपर्टी डिलरची निर्घृण हत्या केली. त्याच्या दोन साथीदारांनाही गंभीर जखमी केले. दिघोरी टोलनाक्यावर

टोल नाक्यावर हत्या
वसुलीतून खुनी संघर्ष : दोन गंभीर जखमी
नागपूर : टोल नाक्यावर वसुलीसाठी ठेवलेल्या गुंडांनी वाद सोडवण्यासाठी आलेल्या एका गुन्हेगार कम प्रॉपर्टी डिलरची निर्घृण हत्या केली. त्याच्या दोन साथीदारांनाही गंभीर जखमी केले. दिघोरी टोलनाक्यावर रविवारी रात्री ११ ते १२ असा सुमारे तासभर खुनी संघर्ष चालला. या घटनेने परिसरात प्रचंड थरार निर्माण झाला होता.
निखील मनोज राऊत (वय २५, दुबेनगर नागपूर), नरेश नासागोणीवर, अनिल राऊत, मानवटकर आणि अन्य काही मित्र रविवारी रात्री कापसी-महालगाव येथून पार्टी करून इनोव्हा (एमएच ०४/ ईएक्स ६९१९) नागपूरला येत होते. दिघोरी टोलनाक्यावर पावती फाडण्याच्या (टोल देण्याच्या) वादातून टोलनाक्यावरील गुंडांसोबत त्यांची बाचाबाची झाली. निखिलने मोबाईलवरून ही माहिती देऊन नरेश धनराज बागडे (वय ३०, रा. निळकंठनगर हुडकेश्वर), संदेश सुभाष पाटील (वय २५, रा. नासरे मंगल कार्यालयाजवळ हुडकेश्वर) चंद्रशेखर लिल्हारे आदींना टोल नाक्यावर बोलवून घेतले. तोपर्यंत टोल नाक्यावरील गुंडांनीही आपले सशस्त्र साथीदार बोलावून घेतले होते. त्यांनी नासागोणीवर तसेच त्यांच्या मित्रांना बदडून काढले. ही हाणामारी सुरू असतानाच तेथे नरेश बागडे, संदेश पाटील, लिल्हारे पोहचले. त्यांनी ‘हमारे आदमी का टोल नाका है. हमसे वसुली कोण कर रहा‘, अशी भाषा वापरून मित्रांना मारहाण करणारे कोण, अशी विचारणा केली. प्रत्युत्तरात पप्पू मोहबिया, अर्जुन रेड्डी, नागार्जुन आणि त्याच्या साथीदारांनी तलवार आणि अन्य घातक शस्त्रे तसेच लाकडी फळ्यांनी बागडे, पाटील तसेच त्यांच्या साथीदारांवर हल्ला चढवला. गंभीर जखमी झालेले हे सर्व जीवाच्या धाकाने रस्ता मिळेल तिकडे पळू लागले.
काही अंतरावरच बागडे कोसळला अन् तेथेच पडून राहिला. या खुनी संघर्षामुळे टोल नाक्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांमध्ये प्रचंड दहशत निर्माण झाली.
दरम्यान, मध्यरात्री या घटनेची माहिती कळल्यानंतर हुडकेश्वर पोलिसांनी तेथे धाव घेतली. आज सकाळी बागडेचा मृत्यू झाल्याचे कळल्याने घटनास्थळ परिसर, नरसाळा भागात प्रचंड तणाव निर्माण झाला होता.
निखिल राऊतच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली गुन्हे दाखल केले. या घटनेचा पुढील तपास हुडकेश्वर पोलीस करीत आहेत. (प्रतिनिधी)
मध्यस्थीमुळेच गेला बळी
-बागडेच्या हत्येची वार्ता सकाळी हुडकेश्वर भागात पसरली अन् त्यामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. बागडे याने २०११ मध्ये एकाची हत्या केली होती. काही महिन्यांपूर्वीच तो या प्रकरणातून सुटला. त्यामुळे त्याची परिसरात दहशत होती. सध्या तो प्रॉपर्टी डीलिंग आणि वादग्रस्त प्रकरणात मध्यस्थी करायचा. रात्रीसुद्धा मध्यस्थीच्या प्रयत्नातच त्याची हत्या झाली. त्यामुळे संतप्त समर्थकांनी एका स्टार बसवर दगडफेकही केली. बागडेची हत्या करणाऱ्यांमध्ये सहा ते आठ आरोपी असून, त्यातील पप्पू, नागार्जुन आणि अर्जुन या तिघांना पोलिसांनी अटक केली. त्यांचे साथीदार मात्र फरार आहेत.
टोलनाका अन् टोळी
-सूत्रांच्या माहितीनुसार, या टोलनाक्यावर वसुलीचे कंत्राट धुळ्याच्या एका कंपनीला मिळाले आहे. मात्र, सदर कंपनीकडून एका कुख्यात गुंडाच्या टोळीने पेटी कंत्राट घेतले. या टोळीचे गुंड या टोलनाक्यावर गुंडगिरी करून वसुली करतात. या नाक्यावर नेहमीच वसुलीभार्इंची टोळी पाहायला मिळते. चार महिन्यांपूर्वी येथे यादव नामक गुंडाने गुंडगिरी करून वसुली केली अन् ठाण्यात पोहोचून तेथील अधिकाऱ्यांना शिवीगाळ केली. यावेळी एका पोलीस अधिकाऱ्याने ‘मै यहां का सिंघम हूं’असे म्हणत यादवला अक्षरश: सोलून काढले होते. त्याच्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी या पोलीस अधिकाऱ्याविरोधात पत्रकबाजी, नारेबाजी करून पोलिसांवर दडपण आणण्याचा प्रयत्न केला होता.