तोगडियांचा विखार अन् सरसंघचालकांचे ‘डॅमेज कंट्रोल’
By Admin | Updated: December 26, 2016 02:27 IST2016-12-26T02:27:52+5:302016-12-26T02:27:52+5:30
नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा

तोगडियांचा विखार अन् सरसंघचालकांचे ‘डॅमेज कंट्रोल’
मंचावर मतभेद : जितेंद्रनाथ महाराज म्हणाले,
तोगडियांचे वक्तव्य व्यक्ति स्वातंत्र्याचा भाग
शफी पठाण नागपूर
नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान झाल्यापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या सर्व शाखा-उपशाखा मोदींच्या कार्याचा सातत्याने पुरस्कार करीत आहेत. परंतु संघालाच आपली मातृसंस्था मानणारी विश्व हिंदू परिषद मात्र या ‘कौतुक यात्रेत’ कधीच सहभागी झाली नाही. विहिंपचे नेते डॉ. प्रवीण तोगडिया तर संधी मिळेल तेव्हा मोदींवर हल्ला चढवित असतात. ही वस्तुस्थिती माहीत असतानाही धर्मसंस्कृती महाकुंभाच्या समारोपाला तोगडियांना प्रमुख अतिथी म्हणून बोलावण्यात आले. सरसंघचालकांच्या उपस्थितीत व देशभरातील संतांच्या मांदियाळीत तोगडिया काही उलटसुलट बोलणार नाहीत, अशी आयोजकांची अपेक्षा असावी. परंतु ही अपेक्षा साफ खोटी ठरवत तोगडियांनी केंद्र सरकारच्या अख्त्यारीतील विषयांसह मुस्लिमांच्या वाढत्या संख्येवरही चौफेर शाब्दिक हल्ला चढविला अन् या अनपेक्षित हल्ल्याने चुकीचा संदेश जाऊ शकतो हे लक्षात येताच दस्तुरखुद्द सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनाच ‘डॅमेज कंट्रोल’साठी मोर्चा सांभाळावा लागला.
या कार्यक्रमात प्रवीण तोगडिया काय बोलतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. तोगडियांनी सुरुवातच राममंदिर अजून का बांधले गेले नाही, या प्रश्नापासून केली अन् पुढे गोहत्याबंदीचे काय झाले, लोकसंख्या कायदा का येत नाही, असे एकामागून एक अनेक प्रश्न क्षेपणास्त्र डागले. भारताला पूर्णत: हिंदू राष्ट्र बनविण्याचे जोरदार समर्थन करीत त्यांनी मुस्लिमांच्या वाढत्या संख्येबाबत अप्रत्यक्षरीत्या केंद्र सरकारला जबाबदार धरले. तोगडिया इतक्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी अमेरिकेत ट्रम्प का राष्ट्रपती होऊ शकले याचे ‘मार्मिक विश्लेषण’ करताना मोदींच्या कार्यशैलीवरही सांकेतिक प्रहार केला.
महाकुंभाच्या मंचावरून सलग तीन दिवस ‘सोशल इंजिनिअरिंग’चा प्रयत्न सुरू असताना त्यांनी एका फटक्यात महाकुंभाचा नूरच बदलून टाकला. यामुळे देशात चुकीचा संदेश जाईल, असे लक्षात येताच सरसंघचालकांनी आपल्या भाषणात तोगडियांचे नाव घेत त्यांच्या वक्तव्यावर पांघरुण टाकण्याचा प्रयत्न केला. नुसत्या प्रखर भाषणांनी भागणार नाही, अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचे असेल तर शक्ती पाठीशी असली पाहिजे. ती पाठीशी नसली की कुणी ऐकत नाही. ही शक्ती समाजातील सर्व स्तरांना सोबत घेतल्याशिवाय मिळू शकणार नाही, असे अधिकारवाणीचे दोन खडे बोल सुनावले. जितेंद्रनाथ महाराजांनीही तोगडियांचे वक्तव्य व्यक्तीस्वातंत्र्याचा भाग असल्याचे सांगितले. परंतु तोपर्यंत तोगडियांच्या शब्दांनी आपला अपेक्षित परिणाम साधला होता.