‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे ‘जीएसटी’वर आज चर्चासत्र
By Admin | Updated: February 24, 2017 03:01 IST2017-02-24T03:01:44+5:302017-02-24T03:01:44+5:30
लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, २४ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता प्राईड हॉटेलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.

‘लोकमत वृत्तपत्र समूहा’तर्फे ‘जीएसटी’वर आज चर्चासत्र
प्रत्यक्ष कर व इंडो-यूएस कर नियमनावर सत्र : प्रश्नांवर तज्ज्ञांचे उत्तर
नागपूर : लोकमत वृत्तपत्र समूहातर्फे शुक्रवार, २४ फेब्रुवारीला दुपारी २.३० वाजता प्राईड हॉटेलमध्ये चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे.
उद्घाटन सत्राच्या अध्यक्षस्थानी लोकमत मीडियाचे चेअरमन आणि माजी राज्यसभा सदस्य विजय दर्डा राहतील. मुख्य अतिथी म्हणून बँक आॅफ इंडियाचे झोनल व्यवस्थापक सी.जी. पोपेरे आणि विक्रीकर विभागाचे सहआयुक्त (व्हॅट, प्रशासन) पी.के. अग्रवाल हजर राहणार आहे.
उद्घाटन सत्रानंतर तांत्रिक सत्र होणार आहे. या सत्रात वरिष्ठ सनदी लेखापाल आणि एन ए शाह असोसिएट्स, मुंबईचे भागीदार अशोक शाह व नरेश सेठ आणि एन एस ग्लोबलचे संस्थापक व व्यवस्थापकीय संचालक सनदी लेखापाल संकेत शाह हे मार्गदर्शन करणार आहेत.
तज्ज्ञ वक्ते प्रत्येक सत्रात ४५ मिनिटे मार्गदर्शन करणार असून त्यानंतर १५ मिनिटे प्रश्नोत्तराचे सत्र राहील.
पहिल्या सत्रात ‘अर्थसंकल्प-२०१७ मध्ये प्रत्यक्ष करात महत्त्वाची दुरुस्ती’ यावर वरिष्ठ सनदी लेखापाल अशोक शाह आणि दुसऱ्या सत्रात सनदी लेखापाल नरेश सेठ हे ‘जीएसटी’मध्ये संधी आणि आव्हाने’ या विषयावर मार्गदर्शन करतील. तिसऱ्या सत्रात सनदी लेखापाल आणि सीपीए (यूएसए) संकेत शाह हे ‘यूएसए-इंडिया कर नियमन’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.
केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली हे जीएसटी परिषदेचे प्रमुख असून त्यांनी नुकतेच उदयपूर (राजस्थान) येथे जीएसटी कायदा मसुद्याला अंतिम स्वरूप दिले.
सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय सत्राच्या दुसऱ्या भागात या मसुद्याला मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. या चर्चासत्राचा व्यापारी, व्यावसायिक, उद्योजक, लघु व मध्यम उद्योजक व मोठ्या उद्योजकांना चर्चासत्राचा फायदा होणार आहे.(प्रतिनिधी)