आज खरा परीक्षेचा दिवस

By Admin | Updated: September 12, 2014 00:51 IST2014-09-12T00:51:41+5:302014-09-12T00:51:41+5:30

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शुक्रवारचा दिवस मोठ्या परीक्षेचा राहणार आहे. विद्यापीठाच्या दौऱ्यावर असलेली ‘नॅक’ (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) समिती शुक्रवारी

Today is the true test day | आज खरा परीक्षेचा दिवस

आज खरा परीक्षेचा दिवस

नागपूर विद्यापीठ : ‘नॅक’ समिती जाणून घेणार विद्यार्थ्यांच्या भावना
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठासाठी शुक्रवारचा दिवस मोठ्या परीक्षेचा राहणार आहे. विद्यापीठाच्या दौऱ्यावर असलेली ‘नॅक’ (नॅशनल असेसमेन्ट अ‍ॅन्ड अ‍ॅक्रेडिटेशन कॉन्सिल) समिती शुक्रवारी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहे. सर्व काही ‘आॅल इज वेल’ सांगण्याच्या विद्यार्थ्यांना सूचना असल्या तरी ऐन वेळी कोणी समस्यांचा पाढा वाचला तर काय हा प्रश्न विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांसमोर आहे. दरम्यान, गुरुवारी ‘नॅक’ समितीने ‘कॅम्पस’मधील निरनिराळ्या विभागांची पाहणी केली.
‘नॅक’ समितीच्या दौऱ्याचे पहिले दोन दिवस तर पाहणीचेच होते. प्रशासनाने सुसज्ज तयारी केल्यामुळे विभाग, ‘कॅम्पस’यांचा ‘लूक’च पालटला होता. परंतु कर्नाटक विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ.ए.एम.पठाण यांच्या नेतृत्वाखालील ‘नॅक’ समितीचे सदस्य शुक्रवारी गुरुनानक भवन येथे विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत. विद्यापीठातील निरनिराळ्या विभागांतील विद्यार्थी यात सहभागी होणार आहे. ‘आयक्यूएसी’तर्फे (इन्टर्नल क्वॉलिटी अ‍ॅश्युरन्स सेल)काही दिवसांअगोदर याची रंगीत तालीमदेखील घेण्यात आली होती. विद्यार्थ्यांना कुठल्या प्रश्नांना कशाप्रकारे उत्तर द्यायचे आहे याचे मार्गदर्शन करण्यात आले होते. परंतु तरीदेखील विद्यापीठात परीक्षा विभागामुळे सहन करावा लागणारा मनस्ताप, सोयीसुविधांचा अभाव इत्यादी समस्या विद्यार्थ्यांनी ‘नॅक’च्या सदस्यांसमोर मांडल्या तर कसे हा प्रश्न अधिकाऱ्यांना सतावतो आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ही प्रशासनासाठी परीक्षेची वेळ राहणार आहे. शुक्रवारी ‘नॅक’ समितीचे सदस्य विद्यापीठाच्या माजी विद्यार्थ्यांशीदेखील संवाद साधणार आहेत.
प्रशासकीय इमारत ‘चकाचक’
शुक्रवारी दुपारनंतर ‘नॅक’ समितीचे सदस्य विद्यापीठाच्या प्रशासकीय इमारत परिसरात येणार आहेत. यावेळी कुलसचिव कार्यालयाला ते भेट देतील. यासोबतच विद्यापीठातील अधिकारी, महाविद्यालयांचे प्राचार्य यांच्याशी सायंकाळी संवाद साधणार आहेत. याकरिता प्रशासनाने जोरदार तयारी केली असून प्रशासकीय इमारत परिसराचा चेहराच पालटला आहे. कार्यालये चकाचक करण्यात आली असून पूर्ण विद्यापीठ ‘पॉश’ झाल्याची चर्चा कर्मचाऱ्यांमध्ये सुरू होती. (प्रतिनिधी)
सादरीकरण नव्हे तर संवादावर भर
‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी दोन चमूंमध्ये विभागून गुरुवारीदेखील निरनिराळ्या शैक्षणिक विभागांना भेटी दिल्या. यात वनस्पतीशास्त्र, औषधीविज्ञान, भूगर्भशास्त्र, व्यवस्थापन, शिक्षण, शारीरिक शिक्षण, प्राचीन इतिहास, जनसंवाद, ललित कला, प्रौढ शिक्षण, विधी, आंबेडकर विचारधारा व अध्यासन केंद्र, पाली प्राकृत, गांधी विचारधारा, संस्कृत इत्यादी विभागांचा समावेश होता. यावेळी विभागप्रमुखांनी आपापल्या विभागाच्या गेल्या ४ वर्षाच्या कामगिरीचे ‘हायटेक’ सादरीकरण केले. परंतु सातत्याने ‘पॉवर पॉईन्ट’ सादरीकरण पाहण्याऐवजी काही ठिकाणी समितीच्या सदस्यांनी विभागप्रमुखांशी थेट संवादच साधला. विभागातील शिक्षकांची संख्या, सुविधा, पुढील काळातील योजनांविषयी त्यांनी जाणून घेतले. अनेक विभागप्रमुखांच्या योजनांचे ‘नॅक’ समितीच्या सदस्यांनी स्वागत केले आणि विद्यार्थी हित डोळ्यासमोर ठेवून जास्तीत जास्त काम करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
विद्यार्थ्यांच्या तोंडाला कुलूप
दरम्यान, ‘नॅक’ समितीने गुरुवारी सायंकाळच्या सुमारास विद्यापीठाच्या पदव्युत्तर वसतिगृहाची पाहणी केली. विद्यार्थ्यांनी आपल्या समस्या किंवा सूचना मनमोकळेपणे सांगाव्यात, असे समितीच्या सदस्यांनी विद्यार्थ्यांना सांगितले. वसतिगृहातील विद्यार्थ्यांना अगदी बुधवारपर्यंत अस्वच्छतेचा सामना करावा लागत होता. याशिवाय त्यांना अनेक समस्या आहेत. परंतु उगाच अधिकाऱ्यांचा रोष नको या भावनेतून विद्यार्थ्यांनी मौन धारण केले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गुरुवारी सकाळपासून युद्धस्तरावर वसतिगृहाची स्वच्छता करण्यात आली. यासोबतच ‘नॅक’समितीतील सदस्यांनी महिला वसतिगृह आणि विदेशी विद्यार्थ्यांच्या नेल्सन मंडेला वसतिगृहाची पाहणी केली.

Web Title: Today is the true test day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.