नागपूर जिल्ह्यातील ग्रा.पं.चा आखाडा रंगणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 13:07 IST2018-09-05T13:04:17+5:302018-09-05T13:07:24+5:30
नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत बुधवारपासून राजकीय आखाडा रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बुधवार, दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रा.पं.साठी उमेदवार आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरू शकतील.

नागपूर जिल्ह्यातील ग्रा.पं.चा आखाडा रंगणार
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : नागपूर जिल्ह्यातील ३८१ ग्रामपंचायतीत बुधवारपासून राजकीय आखाडा रंगणार आहे. निवडणूक आयोगाच्या वेळापत्रकानुसार बुधवार, दि. ५ ते ११ सप्टेंबर दरम्यान ग्रा.पं.साठी उमेदवार आॅनलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज भरू शकतील. उमेदवारांना उमेदवारी अर्ज भरण्यात कोणतीही अडचण निर्माण होऊ नये, यासाठी तालुकास्तरावर मदत केंद्र स्थापन करण्यात आले आहेत.
उमेदवारांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता शक्य तितक्या लवकर उमेदवारी अर्ज सादर करावे असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. सकाळी ११ ते दुपारी ३ या काळात उमेदवार आॅनलाईन पद्धतीने अर्ज भरू शकतील. १२ सप्टेंबर रोजी स्थानिक निवडणूक अधिकारी उमेदवारांची छाननी करतील. उमेदवारांना १५ सप्टेंबर (दुपारी ३ वाजेपर्यंत) उमेदवारी अर्ज मागे घेता येतील. याच दिवशी दुपारी ३ वाजतानंतर निवडणूक चिन्ह वाटप आणि उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात येईल. जिल्ह्यात ३८१ ग्रा.पं. आणि भिलेवाडा येथे होणाऱ्या सरपंचाच्या पोटनिवडणुकीसाठी ६ लाख १७ हजार ६५७ हजार २६ सप्टेंबर रोजी मतदानाचा हक्क बजावतील.
एकूण १२२५ प्रभागात ही निवडणूक होईल. उमेदवारी अर्ज सादर करण्याची तारीख जवळ आल्याने गावातही राजकीय रंग चढला आहे. गटातटांनी प्रचाराला सुरुवात केली असून १५ सप्टेंबरनंतर थेट प्रचाराला सुरुवात होईल. सध्या नागपूर जिल्ह्यातील राजकारणावर भाजपाचा प्रभाव आहे. मात्र आगामी जिल्हा परिषद, विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुका लक्षात घेत अधिकाधिक ग्रा.पं.वर कसा ताबा मिळविता येईल, याकडे काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेनेने लक्ष केंद्रित केले आहे.
असा आहे निवडणूक कार्यक्रम
उमेदवारी अर्ज भरणे : ५ ते ११ सप्टेंबर
उमेदवारी अर्जांची छाननी : १२ सप्टेंबर
उमेदवारी अर्ज मागे घेणे : १५ सप्टेंबर
निवडणूक चिन्ह वाटप : १५ सप्टेंबर
मतदानांचा दिनांक : २६ सप्टेंबर
मतमोजणीचा दिनांक : २७ सप्टेंबर
एकूण ग्रा.पं. निवडणूक - ३८१
सरपंच पदासाठी पोट निवडणूक - ०१
एकूण मतदार - ६,१७,६५७
एकूण प्रभाग - १,२२५