देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत
By योगेश पांडे | Updated: November 13, 2023 20:48 IST2023-11-13T20:47:49+5:302023-11-13T20:48:58+5:30
भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त इतवारी येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.

देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविणार - सरसंघचालक मोहन भागवत
नागपूर : भगवान महावीर यांनी जैन तत्वज्ञानात अहिंसा, संयम व तपस्या ही शाश्वत तत्वे सांगितली आहे. अहिंसेतून समाधानी विचार निर्माण होऊ शकतात. मात्र अहिंसेचे भित्र्यांना आचरण करता येत नाही. जो बलशाली असतो तोच अहिंसेचे आचरण करू शकतो. आजच्या जगाला अहिंसेचीच आवश्यकता असून बलसंपन्न होऊन तिचे रक्षण करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ.मोहन भागवत यांनी केले. यावेळी देशातील सर्व संघ शाखांपर्यंत जैन तत्वज्ञान पोहोचविण्यात येईल, अशी माहितीदेखील त्यांनी दिली. भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त इतवारी येथील श्री पार्श्वनाथ दिगंबर जैन मोठे मंदिर येथे त्यांनी दर्शन घेतले. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी भारतवर्षीय दिगंबर जैन तीर्थक्षेत्र कमिटीचे राष्ट्रीय महामंत्री संतोष जैन, मंदिराचे अध्यक्ष उदय जैन, महानगर संघचालक राजेश लोया उपस्थित होते. संघाच्या विविध गीतांमध्ये जैन विचार अगोदरपासूनच स्वयंसेवकांपर्यंत पोहोचविले जात आहेत. सर्व धर्मांचा आदर केला पाहिजे, हीच शिकवण संघात दिली जाते. भगवान महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त संघाच्या सर्व शाखांमध्ये जैन तत्वज्ञान सांगण्यात येईल. स्वयंसेवकांच्या माध्यमातून ते समाजापर्यंत जाईल, अशी माहिती सरसंघचालकांनी यावेळी दिली.
सत्य सांगण्याचे अनेक मार्ग आहेत व त्यांना प्राचीन काळापासून मान्यता आहे. आपल्या देशांत पुजा, भाषा, परंपरा अनेक प्रकारच्या आहेत. मात्र समाज व राष्ट्र म्हणून प्राचीन काळापासून आपण सर्व एकच आहोत. पंथ, धर्मांमध्ये दर्शन वेगवेगळे आहेत, पण उपदेश एकच आहे. भगवान महावीरांनी सत्य, अहिंसेचा उपदेश दिला. त्याचे पालनदेखील होत आहे. सर्व उपदेशांचे मूळ सारखे आहे. एकोप्याने राहून या मूल्यांचे वर्धन केले पाहिजे. लोभातूनच हिंसा वाढते व जगात आता जी दोन युद्धे सुरू आहेत हे त्याचे उदाहरण आहे. जे आहे त्याच्यात मिळून मिसळून राहू हा स्वभाव अहिंसेतूनच निर्माण होऊ शकतो. अहिंसेवाचून जगाचे कल्याण नाही हे लक्षात ठेवले पाहिजे, असे सरसंघचालक म्हणाले.
२५५० वर्षानंतर जग खूप बदलले आहे, अनेक देश बदलले आहेत. त्यांच्या संस्कृती व परंपरा बदलल्या. मात्र आपल्या देशात भगवान महावीरांनी जे उपदेश केले ते शाश्वत आहेत व ती तत्व कायम आहेत. विविध उत्सवांतून आपण परंपरांची आठवण करतो. ही तत्व जगापर्यंत पोहोचविण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न केले पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.
शहरातील विविध मंदिरांत पोहोचले संघ पदाधिकारी
दरम्यान, महावीर स्वामी यांच्या निर्वाणाच्या २५५० वर्षानिमित्त नागपुरातील विविध जैन मंदिरांमध्ये संघाचे पदाधिकारी व स्वयंसेवक पोहोचले व अभिवादन केले. येत्या काळात जैन मुनींच्या आशीर्वचन ग्रहण करण्यासाठीदेखील संघ स्वयंसेवक जाणार आहेत. दादावाड़ी जैन मंदिर- वैशाली नगर, पारडी जैन मंदिर, सदर जैन मंदिर, तुलसीनगर मंदिर येथेदेखील छोटेखानी कार्यक्रम झाले.