‘टीप डील’ करणारे अडचणीत
By Admin | Updated: February 13, 2016 02:42 IST2016-02-13T02:42:42+5:302016-02-13T02:42:42+5:30
गुन्हेगारासोबत ‘टीप डील’ करून त्याचा बचाव करणाऱ्या घरभेदी पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे.

‘टीप डील’ करणारे अडचणीत
चौकशी सुरू : पोलीस दलात खळबळ
नागपूर : गुन्हेगारासोबत ‘टीप डील’ करून त्याचा बचाव करणाऱ्या घरभेदी पोलिसांची चौकशी सुरू झाली आहे. विशेष म्हणजे, या पोलिसांची याच नव्हे तर यापूर्वीच्या अन्य प्रकरणांतही त्यांची भूमिका तपासली जाणार आहे. परिणामी ‘टीप डील’ करणारे पोलीस चांगलेच अडचणीत आले आहेत.
मोक्काच्या गुन्हेगारासोबत गुन्हे शाखेतील दोन पोलिसांनी ‘टीप डील’ केल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित करताच पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली. शुक्रवारी दिवसभर याच वृत्ताची सर्वत्र चर्चा सुरू होती. वरिष्ठांनीही त्याची गंभीर दखल घेत या बेईमान पोलिसांची चौकशी सुरू केली.
मुख्यमंत्र्यांचे ‘होम टाऊन’ असलेल्या नागपुरात वाढलेली गुन्हेगारी ठेचून काढण्यासाठी तसेच उपराजधानीला सेफ सिटी बनविण्यासाठी गुन्हेगारांचा सफाया करण्याची धडक मोहीम शहर पोलिसांनी सुरू केली आहे. ‘स्पेशल अॅक्शन प्लान’नुसार शहरातील प्रमुख गुन्हेगार आणि त्यांच्या टोळ्यांवर मोक्काची धडाकेबाज कारवाई करण्यात आली. त्यामुळे बहुतांश कुख्यात गुन्हेगार शहरातून पळून गेले आहेत. त्यांना हुडकून काढण्यासाठी शहर पोलीस रात्रंदिवस धावपळ करीत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी धाडी घालत आहेत. यातीलच एक खतरनाक गुन्हेगार पोलीस पोहोचण्यापूर्वीच तेथून पळून जात असल्याचे लक्षात आल्यामुळे गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या गुन्हेगाराच्या ‘संपर्क’ यादीवर नजर टाकली अन् या भ्रष्ट पोलिसांचे पाप अधोरेखित झाले. तब्बल ७२ वेळा संपर्क करून ५३ ते ५५ वेळा त्या गुन्हेगाराशी बोलणी झाल्याचे उघड झाले. ही धक्कादायक माहिती गुरुवारपर्यंत विशिष्ट अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाच माहीत होती. शुक्रवारी लोकमतने यासंबंधाचे वृत्त ठळकपणे प्रकाशित करून एकच खळबळ उडवून दिली. शहर पोलीस दलाला या प्रकरणामुळे जबर हादरा बसला आहे.
दरम्यान, पोलीस आयुक्तांपासून सारेच वरिष्ठ अधिकारी गुन्हेगारीची घाण साफ करण्यासाठी प्रयत्न करीत असताना गुन्हे शाखेतील काही भ्रष्ट घाण वाढवण्यात पुढाकार घेत असल्याचे लोकमतच्या वृत्तामुळे जगजाहीर झाल्याने वरिष्ठांनी त्याची गंभीर दखल घेतली. या पार्श्वभूमीवर, गुन्हे शाखेचे प्रभारी अतिरिक्त आयुक्त रंजनकुमार शर्मा यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी संबंधित कर्मचारी आणि पोलीस अधिकाऱ्याची कसून चौकशी सुरू करण्यात आल्याचे सांगितले. हा प्रकार अतिशय गंभीर असल्यामुळे घाईगडबडीत कारवाई करण्याऐवजी सर्व बाजू तपासूनच कारवाई करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे शर्मा यांनी लोकमतला सांगितले. (प्रतिनिधी)
डीजींकडेही पोहोचली माहिती
या गंभीर प्रकाराची माहिती पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनाही काही जागरूक नागरिकांनी कळविली आहे. ‘मिस्टर क्लीन’ प्रतिमेचे धनी असलेले आणि भ्रष्टाचारांच्या विरोधात दणकेबाज कारवाईसाठी ओळखले जाणारे पोलीस महासंचालक दीक्षित यांच्यापर्यंत प्रकरण गेल्यामुळे दोषींवर कडक कारवाई केली जाईल, अशी जोरदार चर्चा दिवसभर गुन्हे शाखेत होती.