मृत्यूचे सत्र सुरुच
By Admin | Updated: February 9, 2015 01:02 IST2015-02-09T01:02:36+5:302015-02-09T01:02:36+5:30
उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो बेसा येथील रहिवासी होता.

मृत्यूचे सत्र सुरुच
स्वाईन फ्लू संशयित रुग्णाचा मृत्यू : पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ७४
नागपूर : उपराजधानीत स्वाईन फ्लूची दहशत कमी होत नसल्याचे दिसून येत आहे. रविवारी स्वाईन फ्लू संशयित असलेल्या ३५ वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला. तो बेसा येथील रहिवासी होता. या महिन्यात स्वाईन फ्लूचे पाच तर गेल्या माहिन्यात १२ बळी गेले आहेत. जिल्ह्यात स्वाईन फ्लू पॉझिटीव्हची संख्या आतापर्यंत ७४ झाली आहे. स्वाईन फ्लू वाढत असताना प्रशासन फक्त बैठकी घेण्यात व आकडेवारी गोळा करण्यात समाधान मानीत असल्याचे वास्तव आहे.
आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास ३५ वर्षीय रुग्ण उपचारासाठी आला. त्याच्यात स्वाईन फ्लूची लक्षणे दिसताच त्याला भरती करण्यात आले. परंतु काही वेळातच त्याचा मृत्यू झाला. मृत्यूपूर्वी त्याचे नमुने घेण्यात आले होते. परंतु आज रविवार असल्याने मेयोची प्रयोगशाळा बंद राहत असल्याने उद्या हे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत स्वाईन फ्लूचे ७४ रुग्ण आढळून आले आहेत तर गेल्या ३८ दिवसांत १७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)
स्वाईन फ्लूवर बैठक आज
सार्वजनिक आरोग्य विभागाने उद्या ९ फेब्रुवारी रोजी स्वाईन फ्लूवर बैठक बोलविली आहे. सूत्राने दिलेल्या माहितीनुसार या बैठकीत फक्त आकडेवारी गोळा केली जाते. ठोस उपाययोजना किंवा रुग्णांना वाचविण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली जात नाही. यामुळेच सध्याच्या घडीला फक्त मेडिकलमध्येच स्वाईन फ्लूच्या रुग्णांसाठी स्वतंत्र वॉर्ड असून तेथेच उपचार सुरू आहेत. आरोग्य विभाग किंवा महानगरपालिका ही जबाबदारी घेण्यास तयार नसल्याचे चित्र आहे.
रुग्ण २२, व्हेंटिलेटर दोन
मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात २२ रुग्ण भरती असताना फक्त दोनच व्हेंटिलेटर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. परिणामी व्हेंटिलेटर अभावी रुग्ण अडचणीत येत आहेत आहे. विशेष म्हणजे, मेडिकलमध्ये शहरासोबतच विदर्भातून रुग्ण येतात. परंतु आरोग्य विभाग किंवा महानगरपालिका व्हेंटिलेटरची मदत करण्यास समोर येत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.