टिळक स्वराज्य फंड हा क्राऊड फंडिंगचा पहिला प्रयोग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2020 04:07 IST2020-12-26T04:07:44+5:302020-12-26T04:07:44+5:30
योगेश पांडे/ आनंद डेकाटे लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : क्राऊड सोर्सिंग किंवा क्राऊड फंडिंग ही एकविसाव्या शतकातील चर्चेत असलेली ...

टिळक स्वराज्य फंड हा क्राऊड फंडिंगचा पहिला प्रयोग
योगेश पांडे/ आनंद डेकाटे
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : क्राऊड सोर्सिंग किंवा क्राऊड फंडिंग ही एकविसाव्या शतकातील चर्चेत असलेली संकल्पना आहे. पण, तिचा पहिला प्रयोग महात्मा गांधींनी १९२० साली नागपूरमध्ये भरलेल्या काँग्रेस अधिवेशनात केला. टिळक स्वराज्य फंड असे त्या प्रकल्पाचे नाव होते आणि अवघ्या काही महिन्यांमध्ये देशभरातून असहकार व अन्य आंदोलनासाठी तब्बल एक कोटी रुपये उभे राहिले.
मध्य प्रांत व वऱ्हाडाची तत्कालीन राजधानी नागपूरमध्ये २६ ते ३१ डिसेंबर १९२० या कालावधीत भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाने देशाच्या स्वातंत्र्यलढ्याला, असहकार आंदोलन, स्वराज्यप्राप्तीचे ध्येय, चार आण्याचे काँग्रेसचे सदस्यत्व, काँग्रेसची पुनर्रचना, त्यात जिल्हा, प्रांतांना लोकसंख्येच्या प्रमाणात कार्यसमितीत प्रतिनिधित्व अशा अनेक नव्या गोष्टी दिल्या. क्राऊड फंडिंग ही आधुनिक जगाची संकल्पना महात्मा गांधींनी या अधिवेशनातच राबविली. अधिवेशनाच्या समारोपावेळी गांधींनी टिळक स्वराज्य फंडाबाबत स्वतंत्र भाषण केले. आंदोलनासाठी पैसा लागतोच, असे सांगून त्या फंडाला टिळकांचे नाव देण्यामागे ‘स्वराज्य उनका पठनमंत्र था’, असे गौरवोद्गार काढले. पैशाची अफरातफर होऊ शकते, असे सांगताना ‘एक लडकी गांधीजी की लडकी बताकर मारवाड में पैसा इकठ्ठा कर रही है’, असे उदाहरण दिले.
शेकडो शिलेदार विस्मृतीत
नागपूरसह विदर्भातील काँग्रेसच्या शिलेदारांनी दिवस-रात्र मेहनत करून नागपूर अधिवेशन यशस्वी केले. शंभर वर्षांपूर्वी १४ हजाराहून अधिक प्रतिनिधी अधिवेशनाला उपस्थित होते. त्यांच्या सोयीसुविधांचे शिवधनुष्य पेलण्यासाठी काटेकोर नियोजन केले. मात्र, शतक लोटत असताना त्यांचा राजकीय पक्ष तर सोडाच, सामान्य नागपूरकरांनाही विसर पडला आहे.
काँग्रेसच्या ऐतिहासिक अधिवेशनासाठी झटलेले काहीजण पुढेदेखील काँग्रेससोबत राहिले. मात्र, अनेक प्रमुख पदाधिकारी पाच वर्षांनंतर स्थापन झालेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघात गेले. नागपूरमधील रस्ते, चौक, वस्त्यांना काही पदाधिकाऱ्यांची नावे देण्यात आली असली, काहींचे काहींचे पुतळे उभारण्यात आले असले तरी नव्या पिढीला ते नेमके कोण, हे माहीत नाही.
नागपूर काँग्रेसची स्वागत समिती
अध्यक्ष - सेठ जमनालाल बजाज, उपाध्यक्ष- एम. आर. दीक्षित, सरचिटणीस - डॉ. बा. शि. मुंजे, सहसचिव- एम. आर. चोळकर व एम. भवानी शंकर. सदस्य- एन. आर. आळेकर, ए. एन. चोरघडे, जी. व्ही. देशमुख, डॉ. हरीसिंह गौर, एम. के. पाध्ये, व्ही. एम. जकातदार, एम. आर. बोबडे, निळकंठराव उधोजी, धुंडीराज ठेंगडी, डब्ल्यू. एच. धाबे, एन. के. वैद्य, डॉ. एल. व्ही. परांजपे, डब्ल्यू. आर. पुराणिक, एम. व्ही. अभ्यंकर, भास्करराव पंडित, जी. ए. ओगले, व्ही. एस. पटवर्धन, के. पी. वैद्य, डॉ. एन. बी. खरे, जी. आर. देव, हिरालाल टिंगुरिया, शिवनारायण बाजपेयी.
क्रॉडक टाऊनचे झाले काँग्रेसनगर
या अधिवेशनाचे आयोजन शहराच्या वेशीवरील क्रॉडक टाऊन येथे करण्यात आले होते. याशिवाय धंतोलीतदेखील मंडप टाकण्यात आले होते. धंतोलीचे मालगुजार एम. व्ही. अभ्यंकर यांनी त्यासाठी जागादेखील दिली होती. पुढे क्रॉडक टाऊनचे काँग्रेसनगर झाले. देशाला दिशा देणाऱ्या या भागातील बहुतांश लोकांनादेखील या जागेचे महत्त्व माहिती नाही, हे जळजळीत वास्तव आहे.
जेमतेम ३ लाखांवर खर्च
आजचे सगळे राजकारण पैशाभोवती फिरत असताना शंभर वर्षांपूर्वीचे काँग्रेस अधिवेशन आयोजित करण्यासाठी किती खर्च आला असावा? मुंबईच्या मे. सी. एच. सुपारीवाला ॲण्ड कंपनीने केलेल्या अंकेक्षणानुसार संपूर्ण अधिवेशनाचा खर्च ३ लाख १२ हजार ३०२ रुपये, ३ आणे व ५ पैसे इतका होता. स्वागताध्यक्ष जमनालाल बजाज, सरचिटणीस डॉ. बा. शि. मुंजे यांच्या नेतृत्वातील आयोजकांनी स्वत: १ लाख ५ हजार ४६४ रुपये ३ आणे जमा केले होते. प्रतिनिधींकडून शुल्कापोटी १ लाख ४६ हजार ३०३ रुपये आले, तर देणगीरूपाने ३ हजार ६५५ रुपये, १२ आणे जमा जमा झाले होते.
साडेचौदा हजार प्रतिनिधींची उपस्थिती
नागपूर काँग्रेस अधिवेशन २६ ते ३१ डिसेंबर असे सहा दिवस चालले. पण, प्रत्यक्ष कामकाज चारच दिवस झाले. २७ व २९ डिसेंबरला सुटी होती. आताच्या काँग्रेसनगरमध्ये अधिवेशन मंडप आणि प्रतिनिधींची निवास व्यवस्था होती. दहा हजार खुर्च्या व दोन हजार बाकांची सुविधा होती. समारोपावेळी खुद्द महात्मा गांधींनी अहमदाबादचे निमंत्रण देताना नागपूरएवढ्या खुर्च्या नसतील, अशा शब्दात कौतुक केले होते. १३ हजार ५३२ हिंदू व १०५० मुस्लीम असे १४ हजार ५८२ प्रतिनिधी अधिवेशनाला आले. त्यात १४ हजार ४१३ पुरुष व १६९ स्त्रिया होत्या. अधिवेशन मध्य प्रांतात असल्यामुळे अर्थातच सर्वाधिक ५,६२६ प्रतिनिधी यजमान प्रांताचे होते तर त्या खालोखाल ३,०२८ प्रतिनिधी मुंबई प्रांतातून आले होते. आताचा पश्चिम विदर्भ किंवा वऱ्हाडला बेरार म्हणून स्वतंत्र प्रांताचा दर्जा होता व तेव्हाच्या बेरारमधून २,९३१ प्रतिनिधी नागपूर अधिवेशनाला उपस्थित राहिले. सध्याचे म्यानमार हेदेखील तेव्हा एक काँग्रेस प्रांत होता व तिथूनही १९ प्रतिनिधी नागपूरला आले होते. दूरवरच्या सिंधमधून १९४ प्रतिनिधी आले. बंगाल-८६४, मद्रास-३२८, युनायटेड प्रोव्हिन्स (सध्याचा उत्तर प्रदेश)-७२९, पंजाब-२६८ व दिल्ली-१३९ अशी अन्य प्रांतांमधून आलेल्या प्रतिनिधींची संख्या होती.