टिकेकरांनी अभिजातपणा जोपासला
By Admin | Updated: January 24, 2016 02:43 IST2016-01-24T02:43:53+5:302016-01-24T02:43:53+5:30
भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, ...

टिकेकरांनी अभिजातपणा जोपासला
श्रीपाद जोशी : अरुण टिकेकर यांना श्रद्धांजली
नागपूर : भांडवली शक्तींचे प्रस्थ वाढल्याने पत्रकारितेमध्ये व्यावसायिकता वरचढ ठरत आहे. अशा परिस्थितीमध्ये मालकांसोबतच वाचकांना नेमके काय पाहिजे, याची जाणीव एक संपादक म्हणून डॉ. अरुण टिकेकरांना होती. व्यावसायिकता वाढलेल्या काळातही डॉ. टिकेकरांनी पत्रकारितेतील अभिजातपणा आणि सत्यता जपली, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी केले.
डॉ. अरुण टिकेकर यांच्या श्रद्धांजली सभेत अध्यक्षस्थानी बोलतांना श्रीपाद जोशी यांनी टिकेकरांच्या व्यासंगी व्यक्तिमत्त्वावर प्रकाश टाकला. त्यांच्या अभिजातपणामुळे बॉस म्हणून वागण्यात कडकपणा आला असेल, मात्र बौद्धिक अहंकार त्यांच्यामध्ये निर्माण झाला नाही. वाचकांना जे हवे आहे ते त्यांच्यापर्यंत पोहचविण्याचे काम त्यांनी वेगवेगळ्या मार्गाने केले. टिकेकरांमुळेच वृत्तांत किंवा पुरवणी पत्रकारितेचा उगम झाल्याचे जोशी म्हणाले. डॉ. टिकेकर यांनी इतिहासाला वेगळी दिशा दिली. पुणे शहर इतिहास ग्रंथाचे उदाहरण देत स्थानिक सामान्य माणसांच्या भावभावना, जडणघडण, त्यांच्या संस्कृतीची सत्यता इतिहास रुपाने संपादित करण्याचे मोलाचे योगदान डॉ. टिकेकरांनी दिले असून विदर्भाचा इतिहास लिहिताना टिकेकरांचे कार्य प्रेरणा देईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. श्रद्धांजली सभेच्यावेळी डॉ. टिकेकर यांची ज्येष्ठ बहीण सुनंदा मोहनी यांनी आपल्या भावना व्यक्त करताना कौटुंबिक जडणघडणीच्या अनेक आठवणी यावेळी सांगितल्या. आजोबा, वडील आणि काका विचारवंत होते आणि या सर्वांनी निर्भिडपणे आपले विचार स्पष्टपणे समाजासमोर मांडले. त्यांचा ग्रंथप्रेमाचा आणि व्यासंगतेचा हाच वारसा अरुणने पुढे चालविल्याचे त्या म्हणाल्या. अरुण आणि आमच्या तीन पिढ्यांनी नवे विचार स्पष्टपणे मांडून विवेकाचा जागर केल्याचा अभिमान असल्याचे त्या म्हणाल्या. मात्र मोठ्या बहिणीने लहान भावाला श्रद्धांजली अर्पण करण्यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या. यावेळी सुनंदा मोहनी यांचे पती दिवाकर मोहनी यांनीही आपले विचार मांडले.
डॉ. टिकेकरांना गुरू मानणारे सुरेश भुसारी यांनी संपादकाची ओळख फोटोतून नाही तर लेखणीतून झाली पाहिजे, असे सांगणारे अरुण टिकेकर उदारमतवादाला समोर नेणारे संपादक असल्याची भावना व्यक्त केली. श्रद्धांजली सभेचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.(प्रतिनिधी)