उसरीपार परिसरात वाघाची दहशत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2017 01:10 IST2017-10-21T01:10:19+5:302017-10-21T01:10:44+5:30
नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यातील नरभक्षी वाघिणीची दहशत कमी होते न होते तोच रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या उसरीपार परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे.

उसरीपार परिसरात वाघाची दहशत
लोकमत न्यूज नेटवर्क
देवलापार : नागपूर जिल्ह्यातील नरखेड व काटोल तालुक्यातील नरभक्षी वाघिणीची दहशत कमी होते न होते तोच रामटेक तालुक्यातील देवलापार नजीकच्या उसरीपार परिसरात वाघाने धुमाकूळ घातला आहे. या वाघाने गावात यायला सुरुवात गेली असून, त्याने मागील आठ दिवसांत पाच जनावरांची शिकार केली आहे. या प्रकाराबाबत स्थानिक नागरिकांनी वन अधिकाºयांना इत्थंभूत माहिती दिली. परंतु, वन अधिकाºयांनी एकाही घटनेचा पंचनामा केला नाही, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
उसरीपार हे गाव मानसिंगदेव अभयारण्यात आहे. जंगलाची सुरुवात ही गावापासूनच होते. मानसिंगदेव अभयारण्यात इतर वन्यप्राण्यांसोबत वाघांचाही वावर आहे. एका वाघाने आठवडाभरापासून त्याचा मोर्चा उसरीपार गावाकडे वळविला आहे. त्या वाघाने उसरीपार येथील रामचरण कुमरे यांच्या मालकीची एक म्हैस व गोºहा ठार मारला. वाघाने ही शिकार गावालगतच्या शेतात गेली. त्यानंतर या वाघाने गावात प्रवेश करून श्रावण कुमरे यांचा बैल, चुन्नीलाल कुमरे यांच्याही बैलाची शिकार केली. वाघ गावात शिरत असल्याने स्थानिक नागरिकांत दहशत निर्माण झाली आहे.
स्थानिक नागरिकांनी या वाघाची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी प्रवीण साठवणे यांना दिली. साठवणे यांनी सदर क्षेत्र आपल्या कार्यक्षेत्रात येत नसल्याचे सांगून ग्रामस्थांची बोळवण केली. त्यामुळे या वाघाच्या बंदोबस्तासाठी तक्रार करायची कुणाकडे असा प्रश्न स्थानिक ग्रामस्थांपुढे निर्माण झाला आहे. वन अधिकारी व कर्मचाºयांच्या नाकर्तेपणामुळे ग्रामस्थ वैतागले आहेत. वन विभागाने या शिकारीची चौकशी करावी आणि नुकसानग्रस्तांना बाजारभावाप्रमाणे नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.