नागपूरच्या महाराजबागेतील वाघ, बिबट्याला मिळतेय हिटरची ऊब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2021 21:26 IST2021-12-01T21:25:30+5:302021-12-01T21:26:04+5:30
नागपूरमधील महाराजबागेत असलेल्या वाघ, बिबट्या व अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ हिटर लावण्यात आले आहे. शिवाय रात्री जमिनीचा गारवा जाणवू नये म्हणून पालापाचाेळ्याचे बीडिंग लावण्यात आले आहे.

नागपूरच्या महाराजबागेतील वाघ, बिबट्याला मिळतेय हिटरची ऊब
नागपूर : हिवाळ्याचा गारठा आता जाेर धरायला लागला आहे. त्यानुसार माणसांना जशी काेवळी ऊन आणि उबदार गाेष्टींची गरज असते तशी प्राण्यांनाही असते. नैसर्गिक अधिवासातील प्राणी त्यांच्या क्षमतेप्रमाणे व्यवस्था करीत असतात. पण माणसांनी बनविलेल्या कृत्रिम अधिवासातील प्राण्यांना ती करून द्यावी लागते. त्याप्रमाणे महाराजबागेतील प्राण्यांसाठी व्यवस्थापनाने तशी व्यवस्था केली आहे.
महाराजबागेचे क्युरेटर डाॅ. बावस्कर यांनी सांगितले, दरवर्षी थंडी सुरू झाली की प्राण्यांना उबदार वातावरण मिळावे म्हणून व्यवस्था केली जाते. यावर्षीही तसे करण्यात आले आहे. वाघ, बिबट्या व अस्वलाच्या पिंजऱ्याजवळ हिटर लावण्यात आले आहे. शिवाय रात्री जमिनीचा गारवा जाणवू नये म्हणून पालापाचाेळ्याचे बीडिंग लावण्यात आले आहे, जेणेकरून रात्री गारठा जाणवला की प्राणी त्यांची नैसर्गिक व्यवस्था करू शकतील. हरणांच्या निवासाजवळही ही व्यवस्था करण्यात आली आहे. थंडीची सर्वाधिक झळ पक्ष्यांना पाेहचते. त्यांना रात्री थंड हवेची झळ पाेहचू नये म्हणून पिंजरे ऊब देणाऱ्या पोत्यांनी झाकले जात असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरमध्ये उपचाराधीन प्राण्यांना थंडीपासून बचावासाठी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र आणखी बऱ्याच गाेष्टींची गरज असून, भेट देण्यास येणाऱ्या नागरिकांना अशा वस्तू घेऊन येण्याचे आवाहन केले जात आहे.