वाघाचे कातडे जप्त; सिंधुदुर्गातील पाच अटकेत
By Admin | Updated: February 23, 2015 00:17 IST2015-02-22T23:45:27+5:302015-02-23T00:17:41+5:30
आजरा येथे कारवाई : ग्रामसेवकाचा समावेश

वाघाचे कातडे जप्त; सिंधुदुर्गातील पाच अटकेत
आजरा : सावंतवाडीतून आजरा येथे विक्रीसाठी आणलेल्या पाच लाख रुपये किमतीच्या पट्टेरी वाघाच्या कातड्यासह पोलिसांनी सहाजणांना सापळा रचून रविवारी अटक केली. आरोपींत ग्रामसेवकासह सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पाचजणांचा, तर आजरा (जि. कोल्हापूर) येथील एकाचा समावेश आहे.याबाबतची माहिती अशी की, किरण सखाराम सावंत (वय ३७, रा. कलंबिस्त, गणेशवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग), अशोक वासुदेव राऊळ (५४, रा. कलंबिस्त दुर्गवाडी, ता. सावंतवाडी), पुंडलिक तुकाराम कदम (४४, रा. वेरले हरिजनवाडी, ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग) हे तिघेजण वाघाचे कातडे घेऊन कलंबिस्त (ता. सावंतवाडी, जि. सिंधुदुर्ग)चे ग्रामसेवक प्रल्हाद बाळासाहेब पाटील (३२, मूळ गाव रा. साळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर) व बाळकृष्ण सदाशिव देवलकर (३८, रा. साळगाव, ता. आजरा) यांच्या मध्यस्थीने विक्रीसाठी आजरा येथे इनोव्हा गाडी (एमएच ०७ क्यू ७८९४) मधून आले होते.
खबऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आजऱ्याचे पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी सापळा रचला. येथील सुशांत पेट्रोल पंपाच्या शेजारील अजिंक्यतारा हॉटेलच्या बोळात लाल रंगाच्या पिशवीतील कातड्यासह आरोपींना दुपारी साडेबाराच्या सुमारास अटक केली.५२ इंच लांब व ३२ इंच रुंदीच्या या कातड्याची किंमत पाच लाख रुपये असल्याचे सांगण्यात आले. वाघाची हत्या करणाऱ्या अरुण महादेव कदम (वय ४०, रा. शिवापूर, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग) यालाही अटक केली. (प्रतिनिधी)
अन्य अवयवांचा शोध सुरू
आंतरराष्ट्रीय बाजारात पट्टेरी वाघाचे कातडे, नखे, हाडे, दात याची प्रचंड किंमत आहे. त्यामुळे मारलेल्या वाघाच्या इतर अवयवांचे आरोपींनी काय केले ? याचा पोलीस कसून तपास करीत आहेत.