व्याघ्र प्रकल्पाचे ‘एसटीपीएफ’ अभयारण्यात!
By Admin | Updated: October 19, 2014 00:58 IST2014-10-19T00:58:04+5:302014-10-19T00:58:04+5:30
राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांच्या संरक्षणासाठी देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ (एसटीपीएफ) तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार

व्याघ्र प्रकल्पाचे ‘एसटीपीएफ’ अभयारण्यात!
गोळीबार प्रकरण : एनटीसीएच्या नियमांचे काय?
नागपूर : राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) वाघांच्या संरक्षणासाठी देशभरातील सर्व व्याघ्र प्रकल्पामध्ये ‘स्पेशल टायगर प्रोटेक्शन फोर्स’ (एसटीपीएफ) तैनात करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार विदर्भातील ताडोबा-अंधारी, पेंच व मेळघाट येथे एसटीपीएफची फोर्स तयार करण्यात आली. एनटीसीएच्या निर्देशानुसार ही संपूर्ण फोर्स संबंधित व्याघ्र प्रकल्पात २४ तास तैनात राहून वाघाची सुरक्षा करेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मात्र असे असताना पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांनी एनटीसीएच्या कोणत्याही नियमांना न जुमानता, पेंचमधील एसटीपीएफ जवानांना बोर, उमरेड-कऱ्हांडला, मानसिंगदेव व टिपेश्वर अशा वेगवेगळ्या ठिकाणी एखाद्या वनरक्षकाप्रमाणे नियुक्त्या केले आहेत.
यामुळे पेंचमधील ‘एसटीपीएफ’ केवळ नावापुरती फोर्स शिल्लक राहिली आहे. नियमानुसार या संपूर्ण फोर्सचा प्रमुख असलेला एसीएफ दर्जाचा अधिकारी हा २४ तास जवानांसह संबंधित व्याघ्र प्रकल्पातील मुख्यालयी असावा, असे अपेक्षित आहे. परंतु पेंचमधील या फोर्सची धुरा असलेले एसीएफ नागपुरातील मुख्यालयात ठिय्या मांडून बसलेले दिसून येतात. एवढेच नव्हे, तर अनेक एसटीपीएफच्या जवानांना बाबुगिरीच्या कामात गुंतविले आहे. यामुळेच शिकारी बंदुकींसह पेंच प्रकल्पात खुलेआम फिरू लागले आहेत. गत आठवड्यात एसटीपीएफचा जवान सतीश शेंदरे याच्यावर शिकाऱ्यांनी केलेले गोळीबाराच्या घटनेतून हा खुलासा झाला आहे. मात्र त्याच वेळी या घटनेने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने (एनटीसीए) एसटीपीएफच्या भरतीसोबतच महत्त्वाच्या गाईडलाईन्स सुद्धा जारी केल्या आहेत.
परंतु पेंच व्याघ्र प्रकल्प कार्यालयातर्फे त्यापैकी एकाही नियमाचे पालन होताना दिसून येत नाही. शिवाय एनटीसीए सुद्धा केवळ बघ्याची भूमिका पार पाडत आहे. एनटीसीएच्या नियमानुसार एसटीपीएफच्या प्रत्येक जवानाजवळ शस्त्र असणे आवश्यक आहे. शिवाय संपूर्ण फोर्स एकाच ठिकाणी कॅम्पमध्ये राहणे आवश्यक आहे. मात्र असे असताना, पेंच व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालकांनी कोणत्या अधिकारात एसटीपीएफ जवानांना वेगवेगळ्या अभयारण्यात पाठविले? याचा एनटीसीए जबाब मागणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष्य लागले आहे. (प्रतिनिधी)