पारडसिंगा जंगलात ‘व्याघ्र’ दर्शन!
By Admin | Updated: March 1, 2016 02:49 IST2016-03-01T02:49:27+5:302016-03-01T02:49:27+5:30
सती अनसूया मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध काटोलशेजारच्या पारडसिंगा येथील जंगलात एक पट्टेदार वाघ दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे.

पारडसिंगा जंगलात ‘व्याघ्र’ दर्शन!
वन विभागाचा वॉच : मध्य प्रदेशातून आल्याचा अंदाज
नागपूर : सती अनसूया मातेच्या तीर्थक्षेत्रासाठी प्रसिद्ध काटोलशेजारच्या पारडसिंगा येथील जंगलात एक पट्टेदार वाघ दाखल झाल्याची माहिती पुढे आली आहे. वन विभाग या वाघावर २४ तास वॉच ठेवून असून, कॅमेरा ट्रॅपमध्ये त्याच्या प्रत्येक हालचाली टिपल्या जात आहेत. विशेष म्हणजे, यासाठी पोलिसांची मदत घेतली जात असून, केंद्रीय सुरक्षा पथकाला तैनात करण्यात आले आहे.
माहिती सूत्रानुसार, सुमारे चार ते पाच दिवसांपूर्वी तो या जंगलात दाखल झाला आहे. तेव्हापासून त्याने येथे ठाण मांडले आहे. सुरुवातीला तो शेजारच्या पेंच वा बोर व्याघ्र प्रकल्पातून आला असावा, असा अंदाज व्यक्त केला जात होता. परंतु वन विभागाच्या कॅमेरा ट्रॅपमध्ये कैद झालेल्या त्याच्या छायाचित्रावरून तो या दोन्ही व्याघ्र प्रकल्पातील नसल्याचा निष्कर्ष व्यक्त करण्यात येत आहे. शिवाय काही जाणकार तो मध्य प्रदेशच्या जंगलातील असल्याचा कयास लावत आहे. मात्र अजूनपर्यंत तो नेमका कुठून आला, याचा ठोस पुरावा मिळालेला नाही. सुरुवातीला या वाघाविषयी गावकऱ्यांमध्ये भीती व्यक्त केली जात होती. परंतु आता त्यांना वाघाच्या अस्तित्वाचे फायदे जाणवू लागले आहे. स्थानिक गावकऱ्यांच्या मते, या वाघाच्या अस्तित्वामुळे इतर वन्यप्राण्यांमुळे त्यांच्या शेतातील पिकांचे होणारे नुकसान अचानक थांबले आहे. मागील अनेक वर्षांनंतर प्रथमच या वन परिक्षेत्रात पट्टेदार वाघाचे दर्शन घडले आहे. त्यामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीयुक्त कुतूहल व्यक्त केले जात आहे. मागील काही वर्षांत वाघांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आहे. (प्रतिनिधी)
गावकऱ्यांनी संयम राखावा
साधारण वाघ म्हणजे वन विभाग असाच समज आहे. परंतु वाघाची सुरक्षा ही केवळ वन विभागाचीच जबाबदारी नसून, प्रत्येक नागरिकाचे ते कर्तव्य आहे. पारडसिंगा राऊंडमधील या वाघावर वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी भयभीत होण्याचे कारण नाही. गावकऱ्यांनी संयम ठेवून, वन विभागाला सहकार्य करावे. वन विभाग वाघ कुठून आला, याचाही शोध घेत आहे.
कुंदन हाते, मानद वन्यजीव रक्षक