वाघ दिसला अन् तो झाडावर चढला!

By Admin | Updated: November 6, 2014 02:46 IST2014-11-06T02:46:30+5:302014-11-06T02:46:30+5:30

जंगलात जनावरे चारण्यास गेलेल्या गुराख्याला अचानक समोर वाघ दिसला.

Tiger appeared and he climbed up the tree! | वाघ दिसला अन् तो झाडावर चढला!

वाघ दिसला अन् तो झाडावर चढला!

मालेवाडा : जंगलात जनावरे चारण्यास गेलेल्या गुराख्याला अचानक समोर वाघ दिसला. त्यामुळे त्याची बोबडी वळली. मात्र प्रसंगावधान राखून तो एका झाडावर चढला अन् संभावित धोका टळला. ही घटना मंगळवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास मालेवाडानजीकच्या किटाळी तलाव परिसरात घडली. सध्या यावर जोरदार चर्चा केली जात आहे.
राजेश्वर हरिभाऊ सूर्यवंशी (२८) असे गुराख्याचे नाव आहे. नेहमीप्रमाणे मंगळवारीही तो जनावरांना (गायी) चारण्यासाठी मुचेपार, एडसंबा परिसरातील जंगलात घेऊन गेला होता. जनावरांना चारल्यानंतर त्याच जंगलालगत असलेल्या किटाळी तलावात जनावरांना पाणी पाजण्यासाठी नेले जाते. नेहमीप्रमाणे दुपारी २ वाजताच्या सुमारास जनावरांना घेऊन तो त्या तलावाच्या दिशेने निघाला. दरम्यान काही अंतरावर जाताच माकडांचे ओरडणे ऐकू आले. त्यामुळे माकडं असलेल्या ठिकाणाकडे जात असताना अचानक २५ ते ३० फूट अंतरावर त्याला पट्टेदार वाघ दिसला. वाघ दिसल्याने राजेश्वरची बोबडी वळली. एक शब्दही तोंडातून निघत नव्हता. मात्र प्रसंगावधान राखून जवळच असलेल्या झाडावर तो चढला. बराच वेळ झाडावर राहिल्यानंतर वाघाचे आपल्याकडे लक्ष नसल्याचे पाहून झाडावरून उतरला आणि धम्मझरी परिसरातील शेताकडे धाव घेतली. तेथे काम करीत असलेल्या शेतकऱ्यांना सदर प्रकार सांगितला. त्यानंतर लगेच वनरक्षक राठोड यांना मोबाईलवरून माहिती दिली. वन विभागाचे अधिकारी येईपर्यंत जनावरांना धोका होऊ शकतो, हे ओळखून राजेश्वरसह शेतकरी घटनास्थळी गेले. तोपर्यंत मात्र वाघाने घटनास्थळ सोडलेले होते. दरम्यान वाघ जनावरांना दिसताच ती जनावरे जंगलात इतरत्र पळत सुटली. रात्री उशिरापर्यंत जनावरांचा शोध घ्यावा लागला. त्यापैकी एका गायीचा शोध लागू शकला नाही. (वार्ताहर)

Web Title: Tiger appeared and he climbed up the tree!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.