गट नव्हे, कार्यकर्त्यांच्या ‘मेरिट’वरच तिकीट
By Admin | Updated: January 5, 2017 02:04 IST2017-01-05T02:04:27+5:302017-01-05T02:04:27+5:30
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे.

गट नव्हे, कार्यकर्त्यांच्या ‘मेरिट’वरच तिकीट
काँग्रेस कमिटीचे धोरण : नेत्यांची शिफारस चालणार नाही, मुलाखतींना महत्त्व, इच्छुकांची परीक्षा
योगेश पांडे नागपूर
आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या तिकीट वाटपात गटातटाच्या राजकारणाला तिलांजली देण्यात येणार आहे. मुलाखतीदरम्यान ‘मेरिट’च्या भरवशावरच इच्छुक उमेदवारांचे नाव तिकिटासाठी अंतिम करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विशेष म्हणजे मनपा निवडणुकांत गटबाजीचा फटका बसू नये यासाठी शहर काँग्रेसकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत. नेत्यांमधील आपापसातील वैचारिक मतभेदामुळे पक्षात गट निर्माण झाल्याचे दिसून येत असताना या धोरणाचा कितपत फायदा होईल, असा प्रश्न निर्माण होत आहे.
आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवार अंतिम करण्याच्या दिशेने काँग्रेसनेदेखील पावले उचलली आहेत.
शहरातील ३८ प्रभागांसाठी पक्षाकडे ११००हून अधिक इच्छुक उमेदवारांनी अर्ज सादर केले आहेत. ८ जानेवारीपासून इच्छुकांच्या मुलाखती होणार आहेत. याअगोदर कुठे ना कुठे अमूक नेत्याच्या जवळचा उमेदवार किंवा तमूक गटाचा खास या ओळखीवर तिकीट अंतिम व्हायचे. नेत्यांकडून आपल्या उमेदवारासाठी विशेष शिफारसदेखील करण्यात यायची.
कुठल्याही नेत्याला प्राधान्य नाही : ठाकरे
यासंदर्भात काँग्रेसचे शहराध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारणा केली असता त्यांनी या धोरणाच्या वृत्ताला दुजोरा दिला. यंदा गटातटाचे राजकारण बंदच होणार आहे. कुठल्याही नेत्याच्या जवळचा उमेदवार म्हणून कुणालाही प्राधान्य देण्यात येणार नाही. प्रक्रियेतून सर्वांना जावे लागणार असून ‘मेरिट’वर नावे अंतिम करण्यात येतील. प्रभागस्तरावरील मेळावे व बैठकांत इच्छुक उमेदवारांची संख्या मोठी राहायची. त्यातून सक्षम व सर्वमान्य चार नावे त्यांनाच काढण्याची सूचना केली. यामुळे तिकीट वाटपानंतर गटबाजीवर अंकुश येईल, असे त्यांनी सांगितले. कुणीही आपले तिकीट अंतिम समजू नये. यंदा गट-नेता नव्हे तर पक्षसमर्थक उमेदवारांनाच प्राधान्य असेल, असेदेखील त्यांनी स्पष्ट केले.