उपराजधानीत ठकबाजांनी लावला ६६० कोटींहून अधिकचा चुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 20:43 IST2018-04-24T20:41:38+5:302018-04-24T20:43:35+5:30
गेल्या काही वर्षांपासून उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.

उपराजधानीत ठकबाजांनी लावला ६६० कोटींहून अधिकचा चुना
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : गेल्या काही वर्षांपासून नागपूर उपराजधानीत आर्थिक घोटाळ्यांचे प्रमाण वाढले आहे. मागील १० वर्षांत नागपुरात १७८ आर्थिक घोटाळे झाले. यातील ८६ घोटाळे ५० लाखांहून अधिक रकमेचे होते व यात ठकबाजांनी नागपूरकरांना ६६० कोटींहून अधिक रकमेचा चुना लावला. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली आहे.
उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत नागपूर शहर पोलीस गुन्हे शाखेकडे विचारणा केली होती. २००८ सालापासून नागपुरात किती आर्थिक घोटाळे झाले, यात ५० लाखांहून अधिक रकमेचे किती घोटाळे होते व नेमकी किती रक्कम गुंतली होती, या घोटाळ्यांसाठी किती लोकांवर कारवाई झाली व किती जणांना अटक झाली, नेमकी किती रक्कम परत मिळाली इत्यादी प्रश्न त्यांनी विचारले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार १ जानेवारी २००८ ते २८ फेब्रुवारी २०१८ या कालावधीत नागपुरात एकूण १७८ घोटाळे झाले. त्यातील ४८ टक्के घोटाळे हे ५० लाख किंवा त्याहून अधिक रकमेचे होते. या घोटाळ्यात गुंतलेल्या रकमेचा आकडा ६६० कोटी ७५ लाख २५ हजार २९८ इतका आहे. यापैकी २३५ कोटी ४३ लाख ७५ हजार रुपयांची रक्कम परत मिळविण्यात गुन्हे शाखेला यश आले. याची टक्केवारी अवघी ३५ टक्के इतकीच आहे.
२०९ आरोपी फरारच
१० वर्षांच्या कालावधीत ५० लाखांहून अधिक रकमेच्या घोटाळ्यात गुंतलेल्या आरोपींची एकूण संख्या ३२४ इतकी आहे. मात्र यापैकी केवळ ११५ आरोपींनाच अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले. अटक करण्यात आलेल्यांची टक्केवारी ही अवघी ३५ टक्के असून २०९ आरोपी मोकाटच आहेत.
२०१४ मध्ये सर्वाधिक फटका
५० लाखांहून अधिक रकमेचे सर्वाधिक १८ आर्थिक घोटाळे २०१६ साली नोंदविण्यात आली व यात ८९ लाख ६१ लाख ११ हजार ७५० रुपयांची रक्कम समाविष्ट होती. मात्र २०१४ साली अवघ्या १० घोटाळ्यामध्ये ठकबाजांनी २३४ कोटी ९५ लाख ६९ हजार ५१० रुपयांचा चुना लावला.