तीन वर्षांत ‘स्टार बस’ने घेतले २३ बळी

By Admin | Updated: April 7, 2016 03:12 IST2016-04-07T03:12:25+5:302016-04-07T03:12:25+5:30

उपराजधानीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नागपूर शहर बससेवेच्या बसेसच्या चालकांच्या ...

In three years 'Star Bus' took 23 wickets | तीन वर्षांत ‘स्टार बस’ने घेतले २३ बळी

तीन वर्षांत ‘स्टार बस’ने घेतले २३ बळी

६० बसेस भंगारात : ७.९३ कोटींचा कर थकविला
नागपूर : उपराजधानीच्या सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा महत्त्वाचा भाग असलेल्या नागपूर शहर बससेवेच्या बसेसच्या चालकांच्या निष्काळजीपणामुळे गेल्या तीन वर्षांत ७९ अपघात झाले आहेत. यात २३ नागरिकांना जीव गमवावा लागला. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली असून शहर बससेवेत समाविष्ट असलेल्या चालकांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
नागपुरातील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराअंतर्गत शहर बससेवेत समाविष्ट असलेल्या बस, त्यांची स्थिती, झालेले अपघात इत्यादींबाबत नागपूर महानगरपालिकेकडे विचारणा केली होती.
मनपाच्या परिवहन विभागातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार जानेवारी २०१३ ते २९ फेब्रुवारी २०१६ या कालावधीत या बसेसमुळे झालेल्या अपघातात ६८ नागरिक जखमी झाले. या अपघातांबाबत न्यायालयात खटले दाखल करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे इतके अपघात झाले असताना शहर बससेवा आॅपरेटर असलेल्या ‘व्हीएनआयएल’तर्फे (वंश निमय इन्फ्राप्रोजेक्ट लिमिटेड) आतापर्यंत केवळ २ लाख २८ हजार १४५ रुपये इतकीच मदत देण्यात आली आहे.(प्रतिनिधी)

बसेसची दुरवस्था
नागपूर शहर बससेवेत ४७० बसेस आहेत. यातील २३० बसेस या ‘व्हीएनआयएल’च्या आहेत, तर २४० बसेस ‘जेएनयूआरएम’ योजनेअंतर्गत मनपाला प्राप्त झाल्या आहेत. यातील ११० बसेस नादुरुस्त आहेत. तर ‘रिअर इंजीन’ असलेल्या ६० बसेस दुरुस्त होऊ शकत नसल्यामुळे त्या चक्क भंगारात टाकण्यात आल्या आहेत.
१२ लाखांचा दंड
‘व्हीएनआयएल’तर्फे शहर बससेवेतील बसेसची योग्य निगा राखण्यात येत नसल्याची नागरिकांची नेहमीच तक्रार असते. अनेक बसेसमध्ये तर बसणे म्हणजे दिव्यच असते. बसेसचा रखरखाव नसल्यामुळे मनपाने तीन वर्षांत ‘व्हीएनआयएल’ला ६ लाख ४९ हजारांचा दंड ठोठावला. तर मंजूर मार्गावर बस न चालविल्याबाबतदेखील ५ लाख ७९ हजारांचा दंड आकारण्यात आला आहे.

७.९३ कोटींचा कर भरणार कधी ?
शहर बस सेवेच्या तिकीट विक्रीतून येणारे सर्व उत्पन्न हे ‘व्हीएनआयएल’कडे जमा होते. प्रवासी कर व बालपोषण अधिभार रकमेचा भरणा ‘व्हीएनआयएल’ला करणे अनिवार्य आहे. ही रक्कम ७ कोटी ९३ लाख इतकी असून ती प्रादेशिक परिवहन कार्यालयात जमा करण्यात यावी असे मूळ करारात नमूद करण्यात आले होते. हा कर अद्याप कंपनीने भरलेला नसून ही रक्कम भरण्यासाठी मनपातर्फे सतत पत्र पाठविण्यात येत आहेत. कंपनीने २०१२ ते २०१६ या कालावधीत बस विमा, पथकर इत्यादीसाठी ६ कोटी ७६ लाख ७२ हजार ९९७ इतकी रक्कम भरली आहे. परंतु कोट्यवधींचा थकीत कर भरल्या जाणार की नाही, हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Web Title: In three years 'Star Bus' took 23 wickets

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.