हायकोर्टात तिघांची जन्मठेप कायम
By Admin | Updated: November 1, 2014 02:49 IST2014-11-01T02:49:52+5:302014-11-01T02:49:52+5:30
मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका थरारक हत्याकांडातील तीन आरोपींची जन्मठेप कायम ठेवली आहे. ही घटना जयताळा येथील आहे.

हायकोर्टात तिघांची जन्मठेप कायम
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने एका थरारक हत्याकांडातील तीन आरोपींची जन्मठेप कायम ठेवली आहे. ही घटना जयताळा येथील आहे.
स्वप्निल राहुल मेश्राम (२३), नीलेश महादेव कावरे (३१) व रूपेश लहू नितनवरे (३२) अशी आरोपींची नावे असून ते सर्व जयताळा येथील रहिवासी आहेत. या प्रकरणात एकूण सहा आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते. नागपूर सत्र न्यायालयाने २० सप्टेंबर २०१२ रोजी सदर तीन आरोपींना भादंविच्या कलम ३०२ (हत्या) अंतर्गत जन्मठेप व प्रत्येकी १००० रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली होती. याविरुद्ध त्यांनी उच्च न्यायालयात अपील केले होते. न्यायमूर्तीद्वय भूषण गवई व विनय देशपांडे यांनी प्रकरणातील विविध बाबी लक्षात घेता आरोपींचे अपील फेटाळून सत्र न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला. सत्र न्यायालयाने अन्य आरोपी धीरज अरुण बंबोले (२९), प्रकाश रमेश डोंगरे (२६) व विनोद हरिदास थुल (२८) यांना निर्दोष सोडले होते.
मृताचे नाव रितेश नरेश मानकर होते. तो व्यवसायाने पेंटर होता. आरोपी व रितेशचे भांडण झाले होते. खटल्यातील माहितीनुसार, आरोपींनी १५ एप्रिल २०११ रोजी रात्री ९.३० च्या सुमारास तलवारी व चाकू घेऊन रितेशच्या घरात प्रवेश केला. त्यावेळी रितेश भोजन करीत होता. आरोपींनी त्याला जागोजागी भोसकून ठार केले. रितेशच्या शरीरावर एकूण ५६ घाव आढळून आले होते. एमआयडीसी पोलिसांनी घटनेचा तपास केला होता. उच्च न्यायालयात शासनातर्फे एपीपी राजेश नायक यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)