कोराडी वीजनिर्मिती केंद्रात सुरक्षेचे तीनतेरा
By Admin | Updated: April 21, 2016 03:15 IST2016-04-21T03:15:19+5:302016-04-21T03:15:19+5:30
कोराडीच्या नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे.

कोराडी वीजनिर्मिती केंद्रात सुरक्षेचे तीनतेरा
मेटल डिटेक्टर बंद : कधीही होऊ शकतो धोका
नागपूर : कोराडीच्या नवीन ६६० मेगावॅट क्षमतेच्या वीजनिर्मिती केंद्राच्या सुरक्षेचे तीनतेरा वाजले आहे. ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी स्वत: अचानक भेट दिल्याने हा प्रकार उघडकीस आला आहे. सुरक्षेची व्यवस्था अत्यंत ढिसाळ असल्यामुळे या केंद्रात कधीही धोका होऊ शकतो, अशी स्थिती असल्याचे लक्षात आले.
वीज केंद्राच्या प्रवेशद्वारावर थातूरमातूर तपासणी केली जात असल्याचे लक्षात आले. वीज केंद्रात जाणाऱ्या व्यक्तीचे ओळखपत्र कुणीही पाहत नाही. तसेच कोणत्याही वाहनाची तपासणी न होताच वाहन थेट वीजनिर्मिती होणाऱ्या संचापर्यंत जाते. आत गेल्यानंतरही कामावर असलेल्या कर्मचाऱ्यांचा बोटाचा ठसा घेणारी मशीन कुणीही काढून नेऊ शकते किंवा बंदही करू शकते. किती कर्मचारी कामावर आले, याचे कोणतेही रेकॉर्ड सुरक्षा रक्षकाजवळ नाही. प्रवेशद्वाराजवळ लावण्यात आलेले तीन मेटल डिटेक्टर बंद अवस्थेत आहेत. मेटल डिटेक्टरमधून गेल्यानंतर डिटेक्टर कोणताही आवाज करीत नाही. वीज केंद्राभोवती असलेल्या सुरक्षा भिंतीला चोरांनी आठ ठिकाणी मोठे छिद्र केल्याचे आढळून आले. अशा कुचकामी सुरक्षेबद्दल प्रचंड संताप ऊर्जामंत्री बावनकुळे यांनी व्यक्त केला असून, संबंधित सुरक्षा रक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना धारेवर धरले.