बजाज यांच्या अपसंपदेच्या तपासासाठी तीन पथके
By Admin | Updated: November 17, 2015 04:29 IST2015-11-17T04:29:46+5:302015-11-17T04:29:46+5:30
जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक

बजाज यांच्या अपसंपदेच्या तपासासाठी तीन पथके
नागपूर : जरीपटक्याच्या सिंधू एज्युकेशन सोसायटीचे सचिव आणि महात्मा गांधी सेंटिनियल सिंधू हायस्कूलचे मुख्याध्यापक दीपक खूबचंद बजाज यांनी भ्रष्टाचाराच्या मार्गाने जमविलेल्या कोट्यवधीच्या अपसंपदेच्या तपासासाठी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक राजीव जैन यांनी तीन पथके कार्यरत केली.
आज सोमवारी सकाळी बजाज यांना सुपर स्पेशालिटी इस्पितळातून सुटी देण्यात आली. एसीबीच्या पथकाने लागलीच त्यांना गुन्ह्याच्या तपासासाठी ताब्यात घेतले. तूर्त बजाज यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांची अँजिओग्राफी आणि थायरॉईड नॉर्मल निघाले आहे. न्यायालयाने बजाज यांना ११ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिल्यानंतर तपास अधिकाऱ्याचा दोन दिवसांचा काळ सुपर स्पेशालिटीत गेला. सोमवारपासून खऱ्या तपासाला सुरुवात झाली आहे. पोलीस उपअधीक्षक किशोर सुपारे हे तपास अधिकारी आहेत. त्यांच्या नेतृत्वात तीन पथके कार्यरत करण्यात आली आहेत.यापूर्वीच्या झडतीत १८ लाख १५ हजार ४९३ रुपये रोख, २ कोटी ६९ लाख १० हजार ३६५ रुपये किमतीचे घरगुती सामान, अशी एकूण २ कोटी ८७ लाख २५ हजार ८५८ रुपये किमतीची स्थावर व जंगम मालमत्ता आढळून आली होती. सिंधू एज्युकेशन कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या लॉकरमध्ये १३ लाख ८६ हजार ६१६ रुपयांची रोख रक्कम आढळून आली होती. बेडरूममध्ये दीपक बजाज यांच्या स्वत:च्या हस्ताक्षरात २६ चिठ्ठ्या आढळून आल्या. त्यावर विविध व्यक्तींना व्याजाने ३ अब्ज ९७ कोटी १६ लाख २७ हजार २९७ एवढी अवाढव्य रक्कम दिल्या उल्लेख होता. बेडरुममधूनच १० कोटी ५७ लाख ५१ हजार ६९ रुपयांच्या ९७ वस्तू खरेदी केल्याच्या पावत्या आढळून आल्या होत्या.