मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तिघे निलंबित
By Admin | Updated: February 5, 2017 02:06 IST2017-02-05T02:06:36+5:302017-02-05T02:06:36+5:30
शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तीन

मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तिघे निलंबित
मतदान केंद्र २५ वर फेरमतदान : शिक्षक मतदार संघाची मतमोजणी आता मंगळवारी
नागपूर : शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीच्या कामात हलगर्जी करणाऱ्या मतदान केंद्र अधिकाऱ्यांसह तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. तसेच संबंधित नवीन नंदनवन येथील मनपाच्या मराठी प्राथमिक शाळा या मतदान केंद्र क्रमांक २५ वर येत्या सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी पुन्हा मतदान घेण्यात येणार आहे, अशी माहिती नागपूरचे विभागीय आयुक्त आणि नागपूर विभागाच्या शिक्षक मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी अनुप कुमार यांनी शनिवारी पत्रपरिषदेत दिली. फेरमतदानाच्या आदेशामुळे आता या मतदार संघातील मतमोजणी ७ फेब्रुवारी रोजी होईल.
सोनाली पुल्लरवार, पी.टी. लांजेवार आणि दिलीप नितनवरे असे निलंबित करण्यात आलेल्या मतदान अधिकाऱ्यांची नावे आहेत. पुल्लरवार या मतदान केंद्र अधिकारी होत्या. त्या नायब तहसीलदार आहेत. तर मतदान अधिकारी पी.टी. लांजेवार हे जिल्हाधिकारी कार्यालयात करमणूक कर निरीक्षक व दिलीप नितनवरे हे जिल्हाधिकारी कार्यालयातील वित्त विभागात कनिष्ठ लिपिक आहेत.
अनुप कुमार यांनी सांगितले की, गुरुवारी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीसाठी मतदान पार पडले. मतदान करताना जांभळ्या रंगाच्या शाईचा विशेष पेनाचाच वापर करणे आणि उजव्या हाताच्या मधल्या बोटाला शाई लावण्याचे स्पष्ट निर्देश देण्यात आले होते. यासंदर्भात अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षणही देण्यात आले होते. असे असताना मतदान केंद्र क्रमांक २५ मराठी प्राथमिक शाळा न्यू नंदनवन येथे डॉटपेनचा वापर होत असल्याची तक्रार एका मतदाराने केली. त्या तक्रारीच्या आधारावर आपण संबंधित केंद्रावर अधिकारी पाठविले. ते जेव्हा मतदान केंद्रावर पोहोचले तेव्हा त्यांना तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. मतदानासाठी जांभळ्या रंगाची शाई असलेला विशेष पेन न वापरता डॉटपेन वापरला जात होता. तसेच सुरुवातीला मात्र विशेष पेन वापरण्यात आल्याचेही निदर्शनास आले. तेव्हा चुकीच्या पद्धतीने बोटाला शाई लावण्यात आल्याचा प्रकार निदर्शनास आला. अधिकारी व जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानुसार त्या ठिकाणी अनियमितता झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
संबंधित मतदान केंद्रावर एकूण ५७० मतदार आहेत. ज्यावेळी हलगर्जीपणा लक्षात आला तेव्हा ४६८ मतदारांचे मतदान झाले होते. यासंदर्भात दिलीप तडस या मतदाराने लिखित तक्रार करीत पुन्हा मतदान घेण्याची मागणी केली. यासंदर्भात आपण केंद्रीय निवडणूक आयोगाशी चर्चा केली.
त्यांना संपूर्ण माहिती दिली. त्यांनी पुन्हा निवडणूक घेण्यास मंजुरी दिली असून, सोमवारी ६ फेब्रुवारी रोजी संबंधित मतदान केंद्र २५ वर सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळात पुन्हा मतदान घेतले जाईल. (प्रतिनिधी)
कॉँग्रेसचे शिक्षकांना आवाहन
मतदान केंद्र अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे नवीन नंदनवन येथील मनपाच्या मराठी प्राथमिक शाळा या मतदान केंद्र क्रमांक २५ वर पुन्हा मतदान होणार आहे. या केंद्रावर चुकीच्या पद्धतीने मतदान प्रक्रिया राबविण्यात येत असल्याची तक्रार काँग्रेसच्या वतीनेही निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे नोंदविण्यात आली होती. त्यामुळे या केंद्रावरील शिक्षक मतदारांनी पुन्हा एकदा ६ फेब्रुवारी रोजी मतदान प्रक्रियेत भाग घ्यावा असे आवाहन काँग्रेसचे प्रदेश महासचिव डॉ.बबनराव तायवाडे आणि काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार अनिल शिंदे यांनी केले आहे.
संबंधित शिक्षक मतदारांना विशेष सुटी
ज्या २५ क्रमाकांच्या मतदान केंद्रावर पुन्हा मतदान होणार आहे त्या ठिकाणी एकूण ५७० मतदार आहेत. या मतदारांना पुन्हा होत असलेल्या मतदानासंबंधी प्रत्यक्ष कळविले जाईल. तसेच त्यांना पुन्हा विशेष सुटीसुद्धा दिली जाईल, असेही विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी सांगितले.