तीन भावंडं बेपत्ता
By Admin | Updated: December 2, 2015 02:59 IST2015-12-02T02:59:34+5:302015-12-02T02:59:34+5:30
एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे.

तीन भावंडं बेपत्ता
गिट्टीखदानमध्ये खळबळ : उलटसुलट चर्चेला उधाण
नागपूर : एका गरीब कुटुंबातील तीन मुले सोमवारी दुपारपासून बेपत्ता झाल्याने गिट्टीखदानमध्ये खळबळ निर्माण झाली आहे. त्यांना कुणी आमिष दाखवून पळवून नेले की ते स्वत:च निघून गेले, त्याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
रोहित (वय ९), अंजली (वय ७) आणि अक्षय (वय ४) अशी ही बालके अतिशय गरीब कुटुंबातील आहेत. रोहित चौथ्या वर्गात, अंजली, दुसऱ्या वर्गात तर अक्षय बालवाडीत आहे. त्यांची आई दीड वर्षांपूर्वी त्यांना सोडून निघून गेली. या मुलांचे वडील मजुरी करतात. काका, आजी, आजोबा अशा संयुक्त कुटुंबात ते गिट्टीखदानमध्ये राहतात. सोमवारी नेहमीप्रमाणे मुलांचे वडील कामावर गेले व दुपारी २ वाजता जेवण करण्यासाठी घरी आले. यावेळी तिन्ही मुले घरी दिसली. वडिलांनी त्यांना शाळेत का गेले नाही, अशी विचारणा केली असता रोहित आणि अक्षयला बरे नव्हते त्यामुळे ते शाळेत गेले नाही आणि ते गेले नाही म्हणून अंजलीही शाळेत गेली नाही, असे त्यांनी वडिलांना सांगितले. त्यानंतर वडील पुन्हा कामावर गेले. घरी एकटे आजोबा होते. २.४५ च्या सुमारास हे तिघे फ्रेण्डस कॉलनीत एका शेजारी राहणाऱ्याला दिसले. त्याने विचारणा केली असता, त्यांनी फिरायला आलो, असे सांगितले. रात्र झाली तरी तीनही भावंड घरी पोहचली नसल्याने कुटुंबीयांनी शोधाशोध सुरू केली. २४ तास होऊनही त्यांचा शोध लागला नाही. (प्रतिनिधी)