बुटीबोरी चौकात वाहतूक नियमांचे तीनतेरा

By Admin | Updated: October 11, 2014 02:50 IST2014-10-11T02:50:52+5:302014-10-11T02:50:52+5:30

राष्ट्रीय महामार्गाचे आपले काही स्वतंत्र नियम असतात. परंतु बुटीबोरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील चौकात त्या सर्व नियमांचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही.

Three rules of traffic rules at Butibori Chowk | बुटीबोरी चौकात वाहतूक नियमांचे तीनतेरा

बुटीबोरी चौकात वाहतूक नियमांचे तीनतेरा

विहंग सालगट नागपूर
राष्ट्रीय महामार्गाचे आपले काही स्वतंत्र नियम असतात. परंतु बुटीबोरी येथील राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ वरील चौकात त्या सर्व नियमांचे कुठेही पालन होताना दिसून येत नाही. त्यामुळे येथे नेहमीच ट्रॉफिक जॅमची समस्या निर्माण होऊन, वारंवार अपघात घडतात.
‘लोकमत’ चमूने बुटीबोरी चौकात प्रत्यक्ष भेट दिली असता, येथे वाहतुकीसंबंधी अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. येथील चौकात वाहनांची लांबच लांब रांग लागली होती. त्यावरून चौकात एखादा अपघात झाला असावा, असे चित्र दिसून येत होते. परंतु ‘लोकमत’ चमू चौकात पोहोचताच, तेथे वाहतूक समस्येमुळे जॅम झाली असल्याचे दिसून आले. येथे एकिकडे औद्योगिक विकास दिसून येतो. मोठमोठे रस्ते व साफसफाई दिसून येते तर त्याचवेळी दुसरीकडे बुटीबोरी ग्राम पंचायतीकडे बघितले असता, देशातील खेड्यांचा खरा चेहरा दिसतो. येथे कुणीही वाहतूक नियमांचे पालन करताना दिसून येत नाही. प्रत्येकजण आपल्या मर्जीप्रमाणे वाहन चालवितो.
शिवाय वाहतूक पोलीस दूर उभा राहून तमाशा पाहतो. शेवटी तो एकटा करणार तरी काय, असेच म्हणावे लागेल.
विना सिग्नलचा चौक
वाहनांच्या वर्दळीनुसार कोणत्या मार्गावर सिग्नल असावा, याचा निर्णय घेतला जातो. ट्रॉफिक डायव्हर्ट करण्यासाठी तेथे रोटरी असावे लागते, किंवा उड्डाण पूल हवा असतो. यालाच तांत्रिक भाषेत पीसीयू (पॅसेंजर कार यूनिट) असे म्हणतात. या माध्यमातून कोणत्याही मार्गावरील वाहतुकीचा अंदाज घेता येतो. परंतु बुटीबोरी चौकात ना सिग्नल, ना ट्रॉफिक डायव्हर्ट करण्याची कोणतीही व्यवस्था आहे. माहिती सूत्रानुसार येथे एक उड्डाण पूल प्रस्तावित आहे. परंतु त्याचे निर्माण होईपर्यंत येथील वाहतुकीची समस्या नियंत्रित करावी लागणार आहे. येथे राष्ट्रीय महामार्ग व शेजारीच औद्योगिक वसाहत असल्याने येथे वाहनांची फार मोठी वर्दळ असते. शिवाय बाजूलाच वस्ती आहे. त्यामुळे ट्रॉफिक जॅमचीसमस्या निर्माण होते.
झेब्रा क्रॉसिंग नाही
येथील गर्दीतून वाहनचालक कसेबसे आपली वाहन काढून घेतात. परंतु पायी चालणाऱ्यांपुढे फार मोठी समस्या निर्माण होते. वृद्ध व छोट्या मुलांसाठी येथील रस्ता ओलांडणे एक कसरत असते. येथील चौकात कोणत्याही प्रकारचे झेब्रा क्रॉसिंग तयार करण्यात आलेले नाही.

Web Title: Three rules of traffic rules at Butibori Chowk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.