मेट्रो रेल्वेसाठी भूसंपादनाचे तीन प्रस्ताव
By Admin | Updated: May 21, 2015 02:22 IST2015-05-21T02:22:19+5:302015-05-21T02:22:19+5:30
जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पहिल्या दिवसांपासूनच कामाचा झपाटा सुुरू केला आहे.

मेट्रो रेल्वेसाठी भूसंपादनाचे तीन प्रस्ताव
नागपूर : जिल्हाधिकारी पदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर नवे जिल्हाधिकारी सचिन कुर्वे यांनी पहिल्या दिवसांपासूनच कामाचा झपाटा सुुरू केला आहे. पुढच्या काळात प्रशासकीय कामकाजात अनेक आमूलाग्र बदल झालेले दिसतील, असे त्यांनी संकेतही दिले आहेत.
३८ वर्षीय कुर्वे उत्तराखंड कॅडरचे आयएएस अधिकारी असून ते मूळचे नागपूरचे आहेत. नागपूरसाठी काहीतरी करून दाखवण्याची त्यांची आंतरिक इच्छा त्यांच्या पहिल्या दिवसाच्या कामातूनच दिसून आली. व ती त्यांनी बोलूनही दाखविली. आल्या आल्याच त्यांनी नागपूरच्या वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या नागपूर मेट्रो रेल्वेसाठी लागणाऱ्या भूसंपादनाच्या तीन प्रस्तावांचा मार्ग मोकळा केला व ते शासनाकडे पाठविल्याचे पत्रकारांशी बोलताना सांगितले. त्यानंतर त्यांनी अन्न व नागरी पुरवठा खात्याच्या मार्फत होणारा धान्य पुरवठा आणि त्यानंतर विविध प्रमाणपत्रांसाठी लागणाऱ्या वेळेवर ही मर्यादा आणल्या. पुढच्या काळात प्रशासकीय कामकाजात अनेक आमूलाग्र बदल झालेले दिसतील असे त्यांनी स्पष्ट केले.
मेट्रोच्या कामाला गती
कुर्वे यांनी मेट्रो रेल्वेच्या भूसंपादनाचे तीन प्रस्ताव बुधवारी मंजूर करून शासनाकडे पाठविले. त्यात पटवर्धन हायस्कूलची २२५२.६५ चौ.मीटर, पोलीस व पटर्वधन हायस्कूलच्या ताब्यातील १७८२.७० चौ. मीटर आणि मॉरिस कॉलेजची २२३५.७७ चौ.मीटर जागेचा समावेश आहे. या जागेच्या अधिग्रहणासंदर्भात प्रस्ताव नागपूर सुधार प्रन्यासने फेब्रुवारी महिन्यात जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठविले होते हे येथे उल्लेखनीय.
धान्यसाठ्याची माहिती एसएमएसद्वारे
स्वस्त धान्य दुकानासाठी राज्य शासनाकडून दुकानदारांना देण्यातआलेल्या धान्याची माहिती माहिती एसएमएस कार्डधारकांना एसएमएसद्वारे दिली जाते. मात्र अनेक ग्राहकांचे मोबाईल नंबर बदलले आहेत. ते पुन्हा नव्याने गोळा करण्याच्या सूचना कुर्वे यांनी पुरवठा विभागाला दिल्या आहेत. त्यामुळे धान्य काळ्याबाजारात जाण्यास पायबंद बसेल, असा विश्वास कुर्वे यांनी व्यक्त केला.