स्वयम् मृत्युप्रकरणी तिघांना अटक
By Admin | Updated: June 23, 2017 02:22 IST2017-06-23T02:22:58+5:302017-06-23T02:22:58+5:30
उच्च वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे मृत पावलेल्या स्वयम् उमेश पांडे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणात दोषी असलेल्या

स्वयम् मृत्युप्रकरणी तिघांना अटक
एमआयडीसी पोलिसांची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : उच्च वाहिनीच्या संपर्कात आल्यामुळे मृत पावलेल्या स्वयम् उमेश पांडे या पाच वर्षीय चिमुकल्याच्या मृत्युप्रकरणात दोषी असलेल्या प्रमोद रडके, मुकुंद मांगे आणि मधुकर रडके (सर्व रा. आयसी चौक, हिंगणा मार्ग) या तिघांना एमआयडीसी पोलिसांनी अटक केली.
२० जूनला दुपारी २.३० ते ३ च्या सुमारास चिमुकला स्वयम पांडे याला मुकुंद रेस्टॉरेंटच्या स्लॅबवरून गेलेल्या उच्च दाबाच्या विद्यूत वाहिनीचा जोरदार करंट लागल्यामुळे त्याचा करुण अंत झाला होता. एमआयडीसी पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती.
मात्र, तपासात ज्या ठिकाणी ही दुर्घटना घडली, त्या घर मालकांनी कोणतीही परवानगी न घेता किंवा खबरदारीचा उपाय न करता बांधकाम केले. स्लॅबवरून केवळ दोन फुट अंतरावरून ही धोक्याची वीज वाहिनी गेली असताना देखील आरोपी घरमालकांनी सुरक्षेचे उपाय केले नाही. त्यामुळे निरागस स्वयम पांडेचा नाहक बळी गेला. त्याच्या मृत्यूला प्रमोद रडके, मुकुंद मांगे आणि मधुकर रडके हे घरमालक तसेच वीज मंडळाचे संबंधित अधिकारी आणि या बांधकामाकडे दुर्लक्ष करणारे संबंधित अधिकारी दोषी असल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. त्यामुळे स्वयमचे वडील उमेश प्रकाश पांडे (वय २८, रा. आयसी चौकाजवळ, हिंगणा मार्ग) यांच्या तक्रारीवरून सहायक पोलीस निरीक्षक एस.एस. गायकवाड यांनी गुन्हा दाखल करून उपरोक्त आरोपींना अटक केली.
अन्य दोषींची चौकशी सुरू
या तिघांव्यतिरिक्त संबंधित विभागाचे कोणते अधिकारी दोषी आहेत, त्याची चौकशी सुरू आहे. वीज मंडळ आणि धोक्याच्या ठिकाणी बांधकाम करूनही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांकडे तशा प्रकारचे पत्र देण्यात आले असून, या प्रकरणाला कोणते अधिकारी, कर्मचारी दोषी आहेत, त्याची चौकशी सुरू असल्याची माहिती एमआयडीसी पोलिसांनी दिली आहे.