नागपूर : नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पांतर्गत नागझिरा व पिटेझरी वनपरिक्षेत्रात भीषण आग लागल्याने आग विझविण्याच्या कामात असलेल्या तीन हंगामी मजुरांचा हाेरपळून मृत्यू झाला. इतर दाेन मजूर गंभीर जखमी असून, त्यांच्यावर नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी सकाळच्या सुमारास एका अज्ञात इसमाने ही आग लावल्याचे सांगण्यात येत असून, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुरुवारी सकाळी ११.३० च्या सुमारास या दाेन्ही परिक्षेत्रात एका अज्ञात इसमाने आग लावली. त्यामुळे वनपरिक्षेत्राच्या कक्ष क्रमांक ९८, ९९, १०० व ९७ या परिसरात ही आग फाेफावली. या वनात आग लागल्याचे दिसताच जवळपास ५० ते ६० वनकर्मचारी, अधिकारी आणि हंगामी मजूर ती विझविण्याचे काम करीत होते. सायंकाळी ५ वाजता ही आग आटोक्यात आलीही, परंतु वाऱ्याने पुन्हा अंगार पेटला आणि अचानक आगीने वेढल्याने व पहाडी जागा असल्याने वणवा विझविणाऱ्या तीन हंगामी वनमजुरांचा मृत्यू झाला. मृत पावलेल्यांमध्ये थाडेझरी निवासी राकेश युवराज मडावी (४०), धानाेरी येथील रेखचंद गोपीचंद राणे (४५) व काेसमताेंडी येथील सचिन अशोक श्रीरंगे (२७) या हंगामी वनमजुरांचा समावेश आहे. गंभीरपणे भाजलेल्यांमध्ये सडक अर्जुनी तालुक्यातील थाडेझरी निवासी विजय तीजाब मरस्कोले (४०) व गाेंदिया जिल्ह्यातील बोरुंदा येथील रहिवासी राजू शामराव सयाम (३०) यांचा समावेश आहे. दाेन्ही जखमींना नागपूरच्या खाजगी रुग्णालयात सध्या उपचार सुरू असल्याची माहिती नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक व वनसंरक्षक एम. रामानुजम यांनी दिली. या प्रकरणात आग लावणाऱ्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मृतांच्या वारसांना प्रत्येकी पाच लाख : मुख्यमंत्री
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आग विझविताना जीव गमावलेल्या मृत वनमजुरांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाख रुपये मदत करण्याची घाेषणा केली आहे. शिवाय जंगलाच्या या अग्नितांडवात जखमी झालेल्या वनमजुरांचा संपूर्ण उपचार खर्च शासन करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे.