नागपूर : लागोपाठ तीन दिवसात तीन जणांचे खून करून दहशत माजवणाऱ्या ‘सायको किलर’ राकेश हाडगे याच्या तुळशीनगर येथील घरून पोलिसांनी तीन चाकू आणि रक्ताने माखलेले दोन रुमाल जप्त केले. पोलिसांना अद्यापही तिन्ही मृतदेहांची ओळख पटविण्यात यश आलेले नाही. आरोपीने १५ ते १७ फेब्रुवारी या तीन दिवसात ३० ते ३५ वयोगटातील तीन युवकांच्या देहाची चाकूने अक्षरश: चाळण करून त्यांचा निर्घृणपणे खून केला. त्यापैकी दोन मृतदेह नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळशीनगर रेल्वे लाईनलगतच्या नाल्यात आणि नेहरूनगर रेल्वे क्रॉसिंगवर आढळून आले होते तर तिसरा मृतदेह कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत बाराद्वारी तलावानजीकच्या झुडपात आढळून आला होता. तिसरा खून करून परतत असताना तो पोलिसांच्या तावडीत अडकला होता. त्याचा २४ पर्यंत पोलीस कोठडी रिमांड घेण्यात आलेला आहे. पोलिसांनी आज दिवसभर या सायको किलरला सोबत ठेवून सर्वच ठिकाणच्या घटनास्थळांचे निरीक्षण केले. आरोपीने हे तिन्ही खून कसकसे केले याबाबतची पोलिसांनी माहिती जाणून घेतली. त्यानंतर त्याच्या सांगण्यानुसार त्याच्या घरी जाऊन वेगवेगळ्या गुन्ह्यासाठी वापरलेले तीन चाकू आणि दोन रुमाल जप्त केले. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक एस. एम. बंडीवार हे करीत आहेत. (प्रतिनिधी)
सायको किलरकडून पुन्हा तीन चाकू जप्त
By admin | Updated: February 20, 2015 02:11 IST