तीन घरफोड्यांना कारावास
By Admin | Updated: January 11, 2017 03:07 IST2017-01-11T03:07:56+5:302017-01-11T03:07:56+5:30
मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायत्रीनगर जयदुर्गा ले-आऊट येथे घरफोडी करून २६ हजाराचा ऐवज लंपास करण्याऱ्या....

तीन घरफोड्यांना कारावास
न्यायालय : मानकापूर भागात चोरले होते चांदीचे शिक्के व रोख
नागपूर : मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गायत्रीनगर जयदुर्गा ले-आऊट येथे घरफोडी करून २६ हजाराचा ऐवज लंपास करण्याऱ्या तीन आरोपींना मंगळवारी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी एम. आय. लोकवानी यांच्या न्यायालयाने एक वर्ष साधा कारावास आणि दीड हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सूरज जयराम जाधव (१९), बबलू अंबादास दांडेकर (१९) आणि व्यंकट ऊर्फ बंटी मारोती दांडेकर (१९) अशी आरोपींची नावे असून, ते कोराडी मार्गावरील श्रीकृष्णधाम झोपडपट्टी येथील रहिवासी आहेत.
संध्या प्रकाश पाटील (५४) या गायत्रीनगर जयदुर्गा ले-आऊट प्लॉट ५८ आणि ५९ येथील रहिवासी आहेत. ३ जानेवारी २०१६ रोजी त्या औरंगाबाद येथे गेल्या होत्या. ७ जानेवारी रोजी त्यांनी भाडेकरू महिला साजन हरिओम शर्मा यांना मोबाईलवर संपर्क साधून घराबाबत हालचाल विचारली होती. शर्मा यांनी सर्व ठीक असल्याचे त्यांना कळविले होते. ९ जानेवारी २०१६ रोजी दुपारी २ वाजताच्या सुमारास साजन शर्मा यांनी पाटील यांना त्यांच्या घराचे दार उघडे असल्याची आणि घरातील सामान अस्ताव्यस्त पडून असल्याची माहिती दिली होती. लागलीच दुसऱ्या दिवशी १० जानेवारी रोजी पहाटे ४.१५ वाजताच्या सुमारास संध्या पाटील या आपल्या घरी परतल्या होत्या. त्यांनी घरात जाऊन पाहिले असता आलमारी उघडी होती. कपडे व सामान अस्ताव्यस्त फेकलेले होते. चांदीचे १० शिक्के आणि २५ हजार रुपये रोख अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यांच्या तक्रारीवरून मानकापूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भादंविच्या ४५४, ४५७, ३८० कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी २४ जानेवारी २०१६ रोजी या तीन आरोपींना अटक केली होती. त्यांनी या घरफोडीची कबुली दिली होती. त्यांच्याकडून १२ ग्रॅम पांढऱ्या धातूची लगडी जप्त करण्यात आलेली होती. रोख रक्कम त्यांनी खर्च केलेली होती. सहायक फौजदार शेख इजाज यांनी तपास करून आरोपींविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. न्यायालयात सरकार पक्षाने सहा साक्षीदार तपासले. गुन्हा सिद्ध होऊन न्यायालयाने तिन्ही आरोपींना भादंविच्या ४५४ कलमांतर्गत एक वर्ष साधा कारावास, ५०० रुपये दंड, ४५७ कलमांतर्गत एक वर्ष साधा कारावास, ५०० रुपये दंड तसेच ३८० कलमांतर्गत एक वर्ष साधा कारावास आणि ५०० रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तिन्ही आरोपींना या शिक्षा एकत्र भोगाव्या लागतील. न्यायालयात सरकारच्यावतीने सहायक सरकारी वकील रत्ना घाटे तर आरोपींच्यावतीने अॅड. आर. एफ. पटले यांनी काम पाहिले. नायक पोलीस शिपाई जीवनलाल गुप्ता आणि हेड कॉन्स्टेबल रवींद्र वैद्य यांनी न्यायालयीन कामात सहकार्य केले. (प्रतिनिधी)