एकाच वेळी तीन मैत्रिणी बेपत्ता
By Admin | Updated: June 25, 2017 01:51 IST2017-06-25T01:51:01+5:302017-06-25T01:51:01+5:30
एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस

एकाच वेळी तीन मैत्रिणी बेपत्ता
शाळकरी विद्यार्थिनी : सोनेगावमध्ये खळबळ, अपहरणाचा गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकाच वस्तीत राहणाऱ्या तीन अल्पवयीन मुली घरून निघून गेल्या. शुक्रवारी सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सोनेगावात खळबळ उडाली. बेपत्ता असलेल्या तीन मुलींपैकी दोन आठवीच्या विद्यार्थिनी (वय १३) आणि एक दहावीची विद्यार्थिनी (वय १५) आहे.
सोनेगावच्या इंद्रप्रस्थनगरात आजूबाजूला राहणाऱ्या या तिघी मैत्रिणी आहेत. शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता त्या घरून निघून गेल्या. नेहमीप्रमाणे बाहेर गेल्या असाव्या असे समजून पालकांनी फारसे लक्ष दिले नाही. सायंकाळ झाली तरी त्या परत आल्या नाही.
त्यामुळे आजूबाजूला विचारपूस सुरू झाली. एकीने रागाच्या भरात आम्ही निघून जात आहो, असे सांगितल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर पालकांनी शोधाशोध सुरू केली. नातेवाईक, मैत्रिणींकडे शोध घेऊनही त्यांचा पत्ता न लागल्याने पालकांनी सोनेगाव ठाण्यात सायंकाळी तक्रार नोंदविली. एकीने घरच्या रागावर तर दुसरीने घरी मन लागत नसल्यामुळे पळ काढल्याची चर्चा आहे. एकसाथ तीन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याने पोलिसांनीही लगेच शोधाशोध सुरू केली. याप्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, बेपत्ता मुलींचा शोध घेण्यात येत असल्याची माहिती सोनेगावचे पोलीस उपनिरीक्षक राठोड यांनी दिली.
दिल्लीकडे गेल्याचा संशय
या मुली दिल्लीकडे गेल्या असाव्या, असा संशय आहे. कारण घरून त्या रेल्वेस्थानकावर गेल्या आणि तेथून त्यांनी तिकीट घेतल्यानंतर पळतच फलाटावर उभी असलेली रेल्वेगाडी पकडली. ज्या वेळेचे हे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले. त्यावेळी दिल्लीकडे जाणारी रेल्वेगाडी पहिल्या फलाटावर उभी होती, असे समजते. दरम्यान, तीनही मुलींच्या घरची स्थिती अत्यंत गरिबीची आहे. त्यामुळे त्यांना प्रवासाला जाण्यासाठी पैसे कुणी दिले, असा प्रश्न उपस्थित झाला आहे. या प्रश्नामुळेच त्या तिघींना कुणी फूस लावून पळण्यास बाध्य केले असावे, असा कयास बांधला जात आहे.