भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

By Admin | Updated: May 28, 2015 02:20 IST2015-05-28T02:20:21+5:302015-05-28T02:20:21+5:30

मौदा तालुक्यातील तारसा येथील बॅण्ड पार्टीला नागपूरला घेऊन येत असलेल्या टाटासुमोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली.

Three die in a horrific accident | भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

भीषण अपघातात तिघांचा मृत्यू

कन्हान : मौदा तालुक्यातील तारसा येथील बॅण्ड पार्टीला नागपूरला घेऊन येत असलेल्या टाटासुमोला विरुद्ध दिशेने भरधाव येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली. यात टाटासुमोतील दोघांचा घटनास्थळीच तर, एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला तर, अन्य सात जण गंभीर जखमी झाले. त्यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली. धडक एवढी भीषण होती की, टाटासुमो उलटून ती ट्रकच्या समोरच्या चाकांमध्ये फसली होती. हा अपघात पारशिवनी तालुक्यातील कन्हान पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या कन्हान - तारसा मार्गावरील नीलज गावाजवळ बुधवारी सकाळी ८.१५ वाजताच्या सुमारास झाला.
टाटासुमोचालक गणपत रामाजी हरकंडे (२८, रा. रेवराळ, ता. मौदा) व राष्ट्रपाल सुखराम बावणे (२७), कुवरचंद लाडेकर अशी मृतांची नावे असून, जखमींमध्ये जितेंद्र ताराचंद लाडवे (२७), रामा जगत हरकंडे (५०, रा. रेवराळ, ता. मौदा), मदन केशव लेंडे (४२), गणेश मारोतराव शेंडे (३०), राजू सोनवणे, पंकज सुखराम बावणे आणि बबन टेबे या आठ जणांचा समावेश आहे. यातील तिघे अत्यवस्थ असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.
मौदा तालुक्यातील तारसा (रेल्वे स्टेशन) येथील संपत हरकंडे याचा लग्नसोहळा नागपूर येथे होता. त्यामुळे गणपत हरकंडे यांची एमएच-३१/झेड-६३५ क्रमांकाची टाटासुमो किरायाने घेण्यात आली होती. या टाटासुमोमध्ये बॅण्ड पार्टीतील सर्व सदस्य बसले होते. गणपत हरकंडे हे बॅण्ड पार्टीला घेऊन तारसा (रेल्वे स्टेशन) हून कन्हान मार्गे नागपूरला जायला निघाले.
दरम्यान, नीलज शिवारातील ब्रिक्स कंपनीसमोर विरुद्ध दिशेने येणाऱ्या एमएच-४९/५०८ क्रमांकाच्या भरधाव ट्रकने या टाटासुमोला जोरदार धडक दिली. यात टाटासुमो रोडलगत असलेल्या शेतात फेकल्या गेल्याने उलटली आणि ट्रकमध्ये अडकली. अपघाताच्या आवाजामुळे शेतातील नागरिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.
लगेच कन्हान पोलिसांना सूचना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस व रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली. नागरिकांनी टाटासुमोतील नऊ जणांना बाहेर काढले. गणपत हरकंडे मात्र आत फसले होते. त्यांना बाहेर काढण्यास वेळ लागल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
सर्व जखमींना लगेच नागपूर येथील मेयो रुग्णालयात हलविण्यात आले. त्यातच राष्ट्रपाल बावणे याचा मृत्यू झाला.
कुवरचंद लाडेकर याचा उपचारादरम्यान मृत्यूमझाला. जखमींपैकी राजू सोनवणेसह अन्य एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली. ट्रकमध्ये फसलेली टाटासुमो ट्रॅक्टरच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. या घटनेमुळे लग्नमंडपात शोककळा पसरली होती.
या टाटासुमोमध्ये मौदा तालुक्यातील कोदामेंढी, मांगली, राजोली व नरसाळा येथील मंडळी असल्याची माहिती जाणकारांनी दिली. या प्रकरणी कन्हान पोलिसांनी नोंद करून तपास सुरू केला आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Three die in a horrific accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.