स्वाईन फ्लूने एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2015 03:02 IST2015-10-05T03:02:41+5:302015-10-05T03:02:41+5:30
मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूसाठी उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यात एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण होते.

स्वाईन फ्लूने एकाच दिवशी तिघांचा मृत्यू
मेडिकल : शिक्षकासह, महिला व वृद्धाचा समावेश
नागपूर : मेडिकलमध्ये स्वाईन फ्लूसाठी उपचार घेत असलेल्या तीन रुग्णांचा एकाच दिवशी मृत्यू झाला आहे. यात एक स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह तर दोन संशयित रुग्ण होते. स्वाईन फ्लू रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत असून या वर्षी नागपूर विभागात १३७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहे. दरम्यान, रविवारी पुन्हा एक रुग्ण आढळून आल्याने रुग्णांची संख्या ६५३ वर गेली आहे.
स्वाईन फ्लू पॉझिटिव्ह असलेले मो. शब्बीर मुजफ्फर (३२) रा. चंद्रपूर, संशयीत रुग्ण सुनीता अशोक नेवारे (४०) रा. गोंदिया व बाबुराव बोमाजी वानखेडे (६७) रा. रामटेक असे मृताचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार मो. मुजफ्फर हे व्यवसायाने शिक्षक आहे. काही दिवस ते अमरावती येथील रुग्णालयात उपचार घेत होते. परंतु येथे त्यांची प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना नागपूर मेडिकल रुग्णालयात हलविले. त्यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्न झाले होते. रविवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
स्वाईन फ्लू संशयित असलेले सुनीता नेवारे यांना गोंदिया जिल्हा रुग्णालयातून शुक्रवारी मेडिकलमध्ये पाठविण्यात आले होते. त्यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असून अद्यापही अहवाल प्राप्त झाला नाही. रविवारी दुपारी त्यांचा मृत्यू झाला, तर बाबुराव वानखेडे यांना शनिवारी मेडिकलमध्ये भरती करण्यात आले होते. दुपारी ३ वाजताच्या दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या तिन्ही रुग्णांचे फुफ्फुस कमजोर झाले होते, असे डॉक्टरांचे म्हणणे आहे. सध्याच्या स्थितीत मेडिकलच्या स्वाईन फ्लू वॉर्डात चार पॉझिटीव्ह तर तीन संशयित रुग्ण उपचार घेत आहेत. (प्रतिनिधी)
२५ खाटांच्या वॉर्डात
व्हेंटिलेटर दोन
स्वाईन फ्लूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने मेडिकलचा २५ क्रमांकाचा वॉर्ड केवळ स्वाईन फ्लू रुग्णांसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. २५ खाटांच्या या वॉर्डात मात्र दोनच व्हेंटिलेटर आहेत. रुग्णांची संख्या पाहता आणखी पाच व्हेंटिलेटर असणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञाचे म्हणणे आहे.
मृत्यूच्या संख्येत घट
राज्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी रुग्णांची संख्या तेवढीच असली तरी मृत्यूची संख्या कमी झाली आहे. नागपुरात या दोन्ही संख्या कमी झाल्या आहेत. गर्भवतींना देण्यात येत असलेल्या स्वाईन फ्लू प्रतिबंधक लस मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. विशेष म्हणजे, खासगी पॅथॉलॉजी लॅबमधून कमी दरात स्वाईन फ्लूची चाचणी करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नागपुरात यासाठी एक लॅब तयार झाली आहे.
-डॉ. सतीश पवार, संचालक, सार्वजनिक आरोग्य विभाग