तीन कोटींचे पाणी बिल माफ
By Admin | Updated: August 11, 2015 04:00 IST2015-08-11T04:00:02+5:302015-08-11T04:00:02+5:30
धरमपेठ झोनमध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांना पाण्याचे

तीन कोटींचे पाणी बिल माफ
नागपूर : धरमपेठ झोनमध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा कार्यान्वित करण्यात आल्यानंतर या भागातील नागरिकांना पाण्याचे अवास्तव बिल पाठविण्यात आले होते. याला ग्राहकांनी विरोध दर्शविला होता. या थकबाकीची वसुली होण्याची शक्यता नसल्याने ३३२७ ग्राहकांकडील तीन कोटी नऊ लाखांचे पाणी बिल माफ करण्याचा निर्णय सोमवारी स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
धरमपेठ झोनमध्ये २४ बाय ७ पाणीपुरवठा कार्यान्वित केल्यानंतर जलवाहिन्यातून झालेली पाणी गळती व वाया गेलेल्या पाण्याचे अतिरिक्त बिल ग्राहकांच्या बिलात लागून आले होते.
वाढीव बिल भरण्याला ग्राहकांनी नकार दिला होता. विलंब शुल्कामुळे थकबाकीच्या रकमेत वाढ होत होती. ही बाब विचारात घेता १६ फेब्रुवारी २०१५ च्या सर्वसाधारण सभेत बिल माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. हा प्रस्ताव शासनाकडे मार्गदर्शनासाठी पाठविण्यात आला होता.
यासंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार स्थायी समितीला असल्याचे शासनाकडून कळविण्यात आले आहे. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश सिंगारे यांनी सोमवारी दिली. (प्रतिनिधी)