उंटखान्यात समाजकंटकांनी जाळल्या तीन कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 4, 2021 04:07 IST2021-01-04T04:07:57+5:302021-01-04T04:07:57+5:30

एका कारचा स्फोट : परिसरात गस्त वाढविण्याची मागणी नागपूर : शनिवारी मध्यरात्री संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंटखाना भागातील ...

Three cars set on fire by rioters in a camel cabin | उंटखान्यात समाजकंटकांनी जाळल्या तीन कार

उंटखान्यात समाजकंटकांनी जाळल्या तीन कार

एका कारचा स्फोट : परिसरात गस्त वाढविण्याची मागणी

नागपूर : शनिवारी मध्यरात्री संवेदनशील परिसर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उंटखाना भागातील दहिपुरा ले-आऊटमध्ये अज्ञात आरोपींनी परिसरातील तीन कार पेटवून दिल्या. यात एका कारचा अचानक स्फोट झाला. अचानक लागलेल्या आगीमुळे परिसरात खळबळ उडाली. इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शनिवारी मध्यरात्री इमामवाडा परिसरात नागरिकांनी आपापल्या घरासमोर रस्त्याच्या कडेला १० ते १२ कार उभ्या केल्या होत्या. मध्यरात्री १ ते २ वाजताच्या सुमारास अज्ञात आरोपींनी ज्वलनशील पदार्थ कारवर टाकून कार पेटवून दिल्या. एका मागून एक अशा तीन कारला आग लागली. आगीने रौद्र रूप धारण करताच कारच्या आतमध्ये गॅस जमा होऊन कारच्या काचा फुटल्या. यात एका कारचा जोरदार स्फोट झाल्यामुळे नागरिक झोपेतून जागे झाले. त्यानंतर आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. लगेच या घटनेची माहिती इमामवाडा पोलिसांना देण्यात आली. इमामवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. या घटनेत संकल्प वानखेडे, अमोल पाटील, चिरकुट ताकसांडे यांच्या कार जळाल्या. संकल्प वानखेडे यांनी दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

...........

पोलीस आयुक्त पोहोचले घटनास्थळी

इमामवाडात कारला आग लागल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त अमितेश कुमार घटनास्थळी पोहोचले. यावेळी अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी उपस्थित होते. पोलीस उपायुक्त डॉ. अक्षय शिंदे, गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त सुधीर नंदनवार आणि पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. घटनेची गंभीर दखल घेऊन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गुन्हेगारांचा शोध घेण्याचे आदेश दिले.

............

Web Title: Three cars set on fire by rioters in a camel cabin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.