तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
By Admin | Updated: November 10, 2015 03:43 IST2015-11-10T03:43:39+5:302015-11-10T03:43:39+5:30
कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगर भागातील साईप्रसाद गृहनिर्माण सोसायटी येथील एका नवविवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी ...

तिघांचा अटकपूर्व जामीन फेटाळला
नागपूर : कोराडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ओमनगर भागातील साईप्रसाद गृहनिर्माण सोसायटी येथील एका नवविवाहितेच्या हुंडाबळीप्रकरणी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने तीन आरोपींचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला.
तुषार प्रवीण डोंगरवार (३०), प्रवीण गंगाधर डोंगरवार (६३) आणि जयश्री प्रवीण डोंगरवार (५३), अशी आरोपींची नावे आहेत. माधुरी ऊर्फ तन्वी तुषार डोंगरवार, असे मृत नवविवाहितेचे नाव होते.
१८ डिसेंबर २०१४ रोजी नागपुरातच माधुरीचा विवाह तुषार डोंगरवार याच्यासोबत झाला होता. माधुरी ही बी.एस्सी., बी. एड. होती. लग्नापूर्वी तुषार हा एका कंपनीत नोकरी करतो. त्याला ३५ हजार रुपये पगार आहे. त्याच्याकडे दोन आणि चारचाकी वाहने आहेत, असे आरोपींकडून सांगण्यात आले होते.
लग्नात साडेपाच लाखांचे दागिने देण्यात आले होते. लग्नानंतर तुषारने माधुरीला पुणे येथे नेले होते. पुणेच्या ‘एजीईआयएस इंडिया’ येथे नोकरीस असल्याचे त्याने सांगितले होते. प्रत्यक्षात तुषार हा नोकरी करीत नसल्याचे माधुरीच्या लक्षात आले होते. ती एफडी आणि आरडीतून आपला खर्च भागवीत होती. तुषार हा तिला मारहाण करून तिचा छळ करीत होता.
आपला खर्च भागविण्यासाठी तो माधुरीच्या एटीएम कार्डचा वापर करीत होता. तिचे दागिनेही त्याने गहाण ठेवले होते. छळामुळे तिचा गर्भपातही झाला होता. माधुरीने फेअरडील पब्लिकेशन कंपनीत नोकरी सुरू केली होती. तिला एक महिन्याच्या प्रशिक्षणासाठी अकोला येथे पाठवण्यात आले होते. परंतु आठवडाभरातच तुषारने तिला पुणे येथे नेले होते. त्यानंतर ती अशक्तपणामुळे नागपुरात आली होती. तिने होणाऱ्या छळाबाबत आपल्या नातेवाईकांना सांगितले होते. सासरची सर्व मंडळी नागपुरात असताना २३ आॅक्टोबर २०१५ रोजी हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून तिने गळफास लावून आत्महत्या केली होती. माधुरीची बहीण मोहिनी ऊर्फ आदिती अमित पळधीकर हिच्या तक्रारीवरून कोराडी पोलिसांनी या तिघांविरुद्ध भादंविच्या ३०४ -ब, ४९८ - ए, ३४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. आरोपींनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. प्रकरण गंभीर असल्याने आरोपींची पोलीस कोठडीतील चौकशी आवश्यक असल्याने न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला. (प्रतिनिधी)